मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. शिवीगाळ करून एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी गोस्वामी विरुद्ध महाराष्ट्र सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे यावेळी उदाहरण देखील दिले.
न्यायालयाने तेजस परिहारला दिलासा देत जामीन देखील मंजूर केला. तेजस परिहारवर भावाच्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणीच मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल देत तेजसला जामीन मंजूर देखील केला आहे. तेजस परिहार हा घाटकोपर येथील रहिवाशी असून त्यांच्यावर भावाच्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप हा लावण्यात आला असून गुन्हा दाखल झाला होता. यासर्व प्रकरणात तेजसने जामीन मिळवण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासर्व प्रकरणाची सुनावणी भारती डांगरे यांच्यासमोर झाली. यामध्ये भारती डांगरे यांनी एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही, असे म्हटले आहे.
या संदर्भात तेजस परिहारला जामीन मंजूर करताना भारती डांगरे म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करताना या दोन्ही मुद्दयांवर पोलिसांचे समाधान होणे महत्वाचे आहे. शिवीगाळ करून एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरणार नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात भादंवि कलम 306 लावायचा असेल तर त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केलेले सबळ पुरावे हवेत. फक्त शिवीगाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त म्हणणे चुकीचे ठरले.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणी कोर्टाने निकाल दिला होता. सार्वजनिकरित्या अपमानास्पद शिवीगाळ करणे म्हणजे, आत्महत्येस प्रोत्साहन देणे किंवा मदत करणे नव्हे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपींविरुद्धचा वादग्रस्त गुन्हा रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.
Attempt to Suicide Cause Responsible Mumbai High Court Decision Curse Article 306