इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. त्या आज कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार घेत असतांना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे जनता दरबारमध्ये काही काळ गोंधळ उडाला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. जनता दरबार सुरु असतांना हल्ला करणारा व्यक्ती निवेदन घेऊन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे आला. त्यांनी निवेदन दिले. त्यानंतर तो अचानक आक्रमक झाला. त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. या व्यक्तीने त्यांचे केस पकडून मारहाण केली. हा व्यक्ती नेमका कोण आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेनंतर आम आदमी पार्टीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये मतभेद आणि निषेधाला स्थान असते, परंतु हिंसाचाराला स्थान नसते. दिल्ली पोलिस दोषींवर कठोर कारवाई करतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील अशी आशा आहे.
तर दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंदर यादव यांनी सांगितले की, हे खूप दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री संपूर्ण दिल्लीचे नेतृत्व करतात आणि मला वाटते की अशा घटनांचा जितका निषेध केला जाईल तितका तो कमीच आहे. परंतु ही घटना महिलांच्या सुरक्षिततेचाही पर्दाफाश करते. जर दिल्लीचा मुख्यमंत्री सुरक्षित नसेल तर सामान्य माणूस किंवा सामान्य महिला कशी सुरक्षित राहू शकेल?