मुंबई – नव्या वर्षात ग्राहकांसाठी बँकिंग सेवा महाग होणार आहे. एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिकचे शुल्क अदा करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने जूनमध्येच बँकांना शुल्कवाढीची परवानगी दिली होती. नव्या वर्षात ती लागू होणार आहे. प्रत्येक बँक ग्राहकांना रोख आणि इतर आर्थिक सेवांसाठी दर महिन्यात निशुल्क सेवा देतात. त्याहून अधिक सेवेचा लाभ घेतल्यानंतर बँकांकडून शुल्क वसूल केले जाते.
इंटरचेंज शुल्क आणि खर्च वाढल्यामुळे बँकांना एटीएममधून रक्कम काढण्यासाठीच्या शुल्कवाढीला परवानगी देण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. अॅक्सिस, एचडीएफसीसह इतर सरकारी व खासगी बँकांमधून रोख रक्कम काढण्यासाठी अधिकचे शुल्क अदा करावे लागणार आहे.
जानेवारीपासून इतके शुल्क
बँकांकडून दर महिन्यात एटीएममधून आठ वेळा पैसे काढण्याची सेवा मोफत देण्यात येते. यामध्ये आर्थिक आणि गैरआर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे. ज्या बँकेत ग्राहकांचे खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्यात पाच वेळा मोफत व्यवहार करण्याची मुभा आहे. तसेच मेट्रो शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि उपनगरांमधील बँकांच्या एटीएममधून पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतात. आता एटीएममधून एका वेळी रोख रक्कम काढण्यासाठी २० रुपये लावले जातात. हेच शुल्क जानेवारीपासून २१ रुपये होणार आहे. यावर सेवा कराच्या रुपात जीएसटीही द्यावा लागणार आहे.