मुंबई – आजच्या काळात जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच मोबाईल ॲप, पेटीएम आदि द्वारे करण्यात येतात. परंतु तरीही काही वेळा आपल्याला कॅश स्वरूपात पैशाची गरज असते. सध्याच्या काळात कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी करणे किंवा रांगा लावणे योग्य वाटत नाही, त्यामुळे सहाजिकच एटीएमचा आधार घेतला जातो. परंतु एटीएममधून पैसे काढताना प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. मात्र काही वेळा माहितीच्या अभावामुळे आपण अडचणीत येतो. देशातील काही मोठ्या बँकांमधील एटीएम मधून पैसे काढण्याबाबत काय नियम आहेत ते जाणून घेऊ या…
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ग्राहक एका दिवसात एटीएममधून किमान १०० आणि २० हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो.
आयसीआयसीआय बँक
बँकेच्या वेबसाइटनुसार, ग्राहक प्लॅटिनम चिप कार्डद्वारे १ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकतो. त्याचबरोबर व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डद्वारे १ लाख ५० हजार रुपये काढता येतात.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना प्लॅटिनम आणि रुपे डेबिट कार्डद्वारे एका दिवसात ५० हजार रुपये काढण्याची परवानगी देते. मास्टर डेबिट कार्ड किंवा क्लासिक रूपे कार्डद्वारे २५ हजार रुपये काढता येतात.
एचडीएफसी बँक
प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे ही बँक दररोज १ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची परवानगी देते, अशी माहिती बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जर बँक खातेदार किंवा ग्राहकाने एका महिन्यात मर्यादेपेक्षा जास्त एटीएम वापर केला, तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील. ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून ५ वेळा मोफत पैसे काढू शकतात. मेट्रो सिटीमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा तीनदा आहे. त्याच वेळी, लहान शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून ५ वेळा मोफत पैसे काढू शकता. प्रत्येक वेळी ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढतात, तेव्हा २० रुपये जास्त द्यावे लागतील.