मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एटीएममधून आता २००० रुपयांच्या नोटा फारच कमी वेळा येतात, अशी चर्चा आता रंगली आहे. गेल्या तीन वर्षात २००० रुपयांच्या नव्या नोटाच छापण्यात आलेल्या नाहीत हे यामागील कारण सांगण्यात येत आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने आरटीआय दाखल केला होता. २०१९ – २०, २०२० – २१ आणि २०२१ – २२ या तीन वर्षांमध्ये २००० रुपयांची एकही नवी नोटा छापण्यात आली नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. आरबीआय नोट मुद्रण (पी) लिमिटेडने २०१६ – १७ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या ३५४२९.९१कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७ – १८ मध्ये अत्यंत कमी १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन २०१८ – १९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या, असं आरटीआयमधून समोर आलं आहे.
२०१६ मध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. बँक ऑफ इंडिया नोट मुद्रन (पी) लिमिटेडकडून मिळालेल्या आरटीआयच्या उत्तरात असं दिसून आलं की २०१९ – २०, २०२० – २१ आणि २०२१-२२ या तीन आर्थिक वर्षांमध्ये २००० रुपयांची एकही नोट छापलेली नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. या निर्णयामुळे जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.
बनावट नोटा वाढल्या
संसदेत १ ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, २०१६ ते २०२० दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २२७२ वरुन २,४४,८३४ वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार २०१६मध्ये देशात २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २२७२ होती. २०१७ मध्ये हे प्रमाण वाढून ७४,८९८ झाले. यानंतर २०१८मध्ये ते ५४,७७६ वर आले. २०१९मध्ये हा आकडा ९०,५६६ आणि २०२० मध्ये २,४४,८३४ बनावट नोटा होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१५मध्ये नवीन क्रमांकाच्या पॅटर्नसह महात्मा गांधी मालिका – २००५मध्ये सर्व मूल्यांच्या नोटा जारी केल्या होत्या. सहज पाहता येण्याजोग्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह, सामान्य जनतेला बनावट नोटा सहज ओळखा येऊ शकतात.
चलनात आल्यापासूनच अफवा
२००० रुपयांच्या नोटा चलनात आल्यापासूनच याविषयी अनेक अफवा पसरत होत्या. परंतु आरबीआयने २००० च्या नोटा चलनातून बाहेर गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अनेक अभ्यासकांच्या मते, २००० च्या नोटेचं मूल्य जास्त असल्याने त्याचा वापर काळा पैसा आणि आर्थिक गैरव्यहारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातच गेल्या तीन वर्षात आरबीआयच्या २००० रुपयांच्या नवीन नोटांची छपाई बंद केली आहे.
ATM 2 Thousand Notes Availability Currency