‘माणसांचा समुद्र वन्स मोर म्हणत होता’
– रमजान मुल्ला
पंच्याएशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य मंडपात होणाऱ्या काव्य संमेलनात माझी निवड झाल्याचं पत्र मिळालं अन् माझ्या अं गावरून मोरपीस फिरत असल्याचा मला भास झाला. वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे साहित्य संमेलन विदर्भात चंद्रपूर या ठिकाणी होणार होतं. इतक्या लांबवर होणाऱ्या साहित्य उत्सवात जाण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. त्या आधी फारतर अकोल्या पर्यंत कविसंमेलनाच्या निमित्ताने एकट्याने गेलेलो. पण यावेळी मी तिकडे जाणारा एकटा नव्हतो. माझ्यासोबत अजून तिघे मित्र होते. त्यामुळे मला अधिक आनंद झालेला.
महाराष्ट्र एक्सप्रेसचं रेल्वेचं बुकिंग केलं. अन् संमेलनाच्या दिवसाची वाट बघत राहिलो. दीड दिवसांच्या महाराष्ट्राच्या अर्धवर्तुळी प्रवासातून दुसऱ्या दिवशी दुपार नंतर वर्ध्याला पोहोचलो. अन् तिथून जवळ असलेले सेवाग्राम बघितले. गांधीजींच्या आश्रमात मनाला खूप शांतता मिळाली. तिथल्या झाडांच्या व साध्या घराच्या सानिध्यात मन प्रसन्न झाले.
सायंकाळी उशिरा चंद्रपुरात महामंडळाने आमची व्यवस्था केलेल्या हॉटेल वर पोहोचलो. सकाळी लवकर उठून साहित्य संमेलनाच्या आवारात गेलो. तिथले वातावरण बघून थक्क झालो. भरगच्च मंडप, खचाखच भरलेले पुस्तकांचे स्टॉल, विद्युत रोषणाई, भलं मोठं प्रवेशद्वार, तिथली भली मोठी रांगोळी हे सगळं अवाढव्य होतं. मुख्य मंडप तर अतोनात फुलांनी सजवला होता. पाठीमागे मोठी स्क्रीन. त्यावर मंडपात चालू असलेला कार्यक्रम लाईव्ह दिसत होता. याच व्यासपीठावरून आपण कविता सादर करणार याचा फक्त विचार करूनच अंगावर फुलांची उधळण झाल्यासारखे वाटले.
संमेलनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते जोरदार पार पडले. साहित्य महामंडळाचे मुख्य कार्यवाह मिलिंद जोशी, अध्यक्षा उषा तांबे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर होणाऱ्या एकेका परिसंवादात वेचक वक्ते आपल्या बाजू लावून धरत होते. अभ्यासाचा खीस पडत होता. डोळे विस्फारून बघण्यापलीकडे मला कांहीच करता येत नव्हतं. टिपण काढत होतो. नव्या लोकांच्या ओळखी करून घेत होतो. पण सगळंच भारावलेलं वातावरण होतं.
आमचं कविसंमेलन एक तासावर आलेलं. पण माझा शिवून घेतलेला नवा पांढरा शर्ट पिशवीत सफरचंद फुटल्यामुळे डागळून गेलेला. माझ्या मित्राने त्यावर पोंड्स पावडर थापली. त्यामुळे डाग थोडासा अंधुक झालेला. मी मनातून थोडा नाराजच होतो. कोणती कविता म्हणावी कविसंमेलनात? हा प्रश्न मला अजिबात सुटत नव्हता. तो प्रश्न साहित्य संमेलनात कथा कथन सत्रात निमंत्रित असलेले माझे मित्र हिंमत पाटील यांनी सोडवला. अन् मी मनाची पूर्ण तयारी करून व्यासपीठावर दिग्गजांच्या मधोमध बसलो. समोर बघतोय तर रसिकांच्या पहिल्या रांगेत विठ्ठल वाघ बापू बसलेले. अन् त्यांच्या मागे समुद्र पसरावा तसे लोकच लोक. प्रत्येक कवी आपली अनुभवाने ताऊन सुलाखून आलेली कविता तासून म्हणू लागले. माझे नाव कधी घेतील याचा मलाही अंदाज नव्हता.औरंगाबाद मधल्या ललित अधाने यांची कविता झाली. अन् माझे नाव पुकारले.
मी शांतपणे माईक वर गेलो. मला हवा तसा माईक लावून घेतला. अन् तितक्याच शांततेने मला तोंडपाठ असलेली माझी “धोंडा” कविता म्हटली. अन् मी डोळे उघडले. त्यावेळी खाली असलेला माणसांचा समुद्र वन्समोssssअर् असे उभे राहून ओरडत होता. त्या सर्वांच्या आग्रहास्तव मला पुन्हा कविता म्हणावी लागली. माझे सगळेच मित्र तर कमालीचे खुश झालेले. अख्ख्या संमेलनात कवितेला वन्स मोअर मिळालेला मी एकटाच कवी. त्यामुळे तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण मला एकदमच ओळखू लागलेला.
दुसऱ्या दिवशीपासून मी दिसेल त्या ठिकाणी लोक मला भेटू लागले. माझ्या सह्या घेऊ लागले. माझ्यासोबत फोटो घेऊ लागले. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. तशात मुख्य मंडपात एखादा परिसंवाद संपला की मधल्या वेळेत काल गाजलेली माझी कविता पुन्हा पुन्हा स्क्रीनवर दाखवली जाऊ लागली. त्यामुळे तर जे लोक काल हजर नव्हते त्यांच्यापर्यंत सुद्धा मी आपोआप पोहोचलो. आपसूकच माझ्या भोवतालचे कोंडाळे वाढू लागले. लोकांशी बोलून बोलून, सतत हसरा चेहरा करून माझा जबडा दुखू लागला. अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मला भेटत होते. चॅनल वाले भेटत होते. मी तीन दिवस वेगळ्याच विश्वात होतो.
अखेर साहित्य संमेलन संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पण मनाने मी अजून तिथेच होतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवणाऱ्या सगळ्या लोकांचे चेहरे डोळ्यापुढे दिसत होते. त्यांचे मनापासून मी आभार मानत होतो. व साहित्य महामंडळाला धन्यवाद देत होतो. … खरंच आठवणी देखील किती मनोरम असू शकतात ना…!!!
– रमजान मुल्ला (मु. पो. नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली. मो. 9372540985)