राजकारणातही साहित्यप्रेमी, त्यांच्याशिवाय रंगत नाही
– भास्कर कदम
साहित्य संमेलनात वैचारिक, साहित्यिक मेजवानी मिळते. काव्य कट्टयावर ‘जे न देखे रवी वो देखे कवी’ याचा शब्दांगणिक साक्षात्कार होतो. संमेलनाचे सूप वाजल्यानंतर त्याचे कवित्व शिल्लक राहते. त्यामुळे साहित्य संमेलन खऱ्याअर्थाने लक्षात राहते. आणिबाणीच्या काळातील साहित्यविदुषी दुर्गा भागवत यांचा दुर्गावतार आजही स्मरणात आहे. राजकारणातील साहित्य रसिक नव्हेतर खऱ्याअर्थाने साहित्यिक असलेले यशवंतराव चव्हाण यांना मंचावर स्थान मिळू शकले नव्हते.
औरंगाबादचे साहित्य संमेलन माझ्या चांगलेच लक्षात राहिले ते राजकारण्यांच्या सहभागाने गाजले ते वेगळ्याच अर्थाने त्याचे कारण असे की, त्यावेळी साहित्यिक आणि राजकारणी यांचेत परिसंवाद झाला तो गाजविला राजकारण्यांनी. साहित्यिकांची काहीशी मिळमिळीत भाषणे, वैचारिक मांडणी आणि राजकारण्यांची चौफेर टोलेबाजी बघायला, ऐकायला मिळाली. साहित्यिकात रंगनाथ पाठारे सारखी अभ्यासू मंडळी होती. राजकारण्यात तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख , विनायकदादा पाटील इत्यादी मंडळी होती. त्यावेळी मंडपातील श्रोते साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांचा भाषणाला भरभरुन दाद देत होती. परिसंवादाच्या फडात राजकारण्यांनी बाजी मारली होती. त्यावेळच्या विनायकदादा पाटील यांच्या भाषणातील एक मुद्दा खास दाद घेऊन गेला. त्यांची मांडणी होती की, शेतकरी सुद्धा खऱ्याअर्थाने साहित्यिक आहे. तो आपल्या काळ्यामातीत साहित्य पिकवतो. धनधान्य हे साहित्य आपल्या जगण्यासाठी उपयुक्त तितकेच आवश्यक असते म्हणून माझ्या दृष्टीने शेतकरी हाही साहित्यिकच आहे. दादांच्या या भाषणाला श्रोतू वर्गातून भरभरुन दाद मिळाली. दादा मूळचे तसे पत्रकार व साहित्यिक. विलासराव देशमुख यांनी तर त्यांच्या खास शैलीत विषयाची मांडणी केली. त्याला तर श्रोते उत्स्फूर्तपणे दाद देत होते, ह्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो.
दुसरा प्रसंग आहे तो साहित्यिक केशव मेश्राम तो त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील आहे. त्यांनी मांडणी केलेला एक मुद्दा फार महत्वाचा होता. तो मुद्दा असा की, कितीदाही विश्वासघात झाला तरी विश्वासाला पर्याय नाही. हा मुद्दा मी प्रत्यक्ष जीवनात रोजच अनुभवत आहे. साहित्यिक जेव्हा वैचारिक मांडणी करतो तेव्हा ते विशेष भावते. हे सत्य मला असेच भावले आहे. राहिला मुद्दा तो राजकारण्यांना प्रत्यक्ष सहभागी करुन घ्यावे की घेवू नये, यावर अनेक मतेमतांतरे आहेत. आणीबाणीचा काळ वेगळा होता. सरकार विरुद्ध भूमिका मांडणे हे तर धाडसाचे होते. दुर्गाबाईंचा विरोध हा आणीबाणीला होता. म्हणून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना विरोध केला होता. त्यावेळी ती भूमिका बरोबर होती. परंतु सरधोपटपणे राजकारण्यांना विरोध करणे चुकीचेच आहे. राजकारणातही साहित्यिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्या सहभागाशिवाय रंगतही नाही, हे वास्तव मी औरंगाबादच्या साहित्य संमेलनात अनुभवले आहे. ते माझ्या कायम स्मरणातही आहे.
– भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष नांदगाव. भ्रमणध्वनी – ९४२३१२७८००