विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. पद्मश्री मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी (१८ जून) रात्री साडेअकराला शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. या आधी त्यांची पत्नी आणि भारतीय व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. फ्लायिंग शीख या नावाने प्रसिद्ध मिल्खा सिंग यांच्या जीवनावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनविण्यात आला होता. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका निभावली होती.
मिल्खा सिंग यांची विचित्र अट
मिल्खा सिंग यांची मुलगी सोनिया सांवलका यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर ‘रेस ऑफ माय लाइफ’, नावाचे पुस्तक लिहिले होते. ते २०१३ मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकाच्या आधारावरच चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’, हा चित्रपट बनिवण्याचा निर्णय घेतला. चित्रपट बनविण्याबाबत जेव्हा राकेश ओमप्रकाश मेहरा हे मिल्खा सिंग यांना भेटले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर एक विचित्र अट ठेवली.
बायोपिकसाठी एक रुपयाची मागणी
एखाद्याच्या जीवनावर चित्रपट बनविण्याची परवानगी देण्यासाठी अनेक जण कोट्यवधींची फिस मागतात. परंतु मिल्खा सिंग यांनी फिल्मफेअरकडून फक्त एक रुपयाची नोट मागितली होती. या एक रुपयाच्या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे, ती नोट १९५८ या वर्षीची होती. त्याच वर्षी राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेत स्वतंत्र भारताच्या इतिहासात मिल्खा सिंग यांनी पहिलेच सुवर्णपदक पटकावले होते. एक रुपयाची ही नोट पाहून मिल्खा सिंग भावूक झाले होते. ही नोट त्यांच्यासाठी कोणत्याही मूल्याच्या वर होती.
अधुरी एक कहाणी…
चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान मिल्खा सिंग म्हणाले होते, की फरहान अख्तर यांनी निभावलेल्या भूमिकेवर ते खूपच खूश आहेत. फरहान याने मिल्खा सिंगसारखे दिसण्यासाठी खूपच मेहनत घेतली होती. परंतु ते जोपर्यंत जगले त्यांच्या मनात एक गोष्ट राहिली होती. त्यांचे अधुरे स्वप्न जिवंत असताना पूर्ण होऊ शकले नाही. रोम येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या हातातून निसटलेले ऑलिम्पिक सुवर्णपदक आपल्या देशात पाहण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले होते. हीच त्यांची शेवटची इच्छा होती. जी पूर्ण होऊ शकली नाही.