नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमधील युवा कलावंत व तबलावादक अथर्व नितीन वारे यांना प्रसारभारती भारत सरकार (आकाशवाणी) ची “A” ग्रेड प्राप्त झाली आहे. ही ग्रेड प्राप्त करणारे नाशिकमधील तिसरे कलावंत असून त्यांचा वयोगटातील प्रथम कलावंत आहेत. अथर्व अदिताल तबला अकॅडमीचा शिष्य असून प्रारंभीचे शिक्षण वडील नितीन वारे यांच्याकडे झाले असून पुढील शिक्षण प्रख्यात तबलावादक व गुरु पं. नयन घोष यांचा कडे सुरू आहे. पं. नयन घोष यांचा अथर्व हा गंडाबंध शागीर्द आहे.
अथर्व ने तबल्यामध्ये बी.ए. एम. ए. केले असून एम. ए. परीक्षेत तो रामानंद तीर्थ विद्यापीठात सुवर्ण पदक विजेता आहे. तसेच त्याने गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद व अलंकार ह्या परीक्षा “अ” श्रेणीत प्राप्त केल्या आहेत. त्याच बरोबर भारत सरकारची शिष्यवृत्ती त्याला प्राप्त आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याने आपली कला सादर केली आहे. नाशिकमधे गेल्या १० वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या “तबला चिल्ला” ह्या अंतरराष्ट्रीय तबला महोत्सवात त्याने आपले वादन पेश केले आहे.
अथर्व सध्या अशोका युनिव्हर्सल स्कूल चांदशी येथे तबला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या त्याचा अभिमानास्पद कामगिरीबद्दल अदिताल तबला अकॅडमी तसेच सर्व नाशिककर कलावंतांतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.