मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके, गाथा आनंदराव खडके आणि शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी कांस्य पदक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. विशेष म्हणजे गाथा आणि शर्वरी यांनी अमेरिकेच्या संघावर अचूक निशाणा साधत एकतर्फी विजय मिळविला आहे. या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे आपल्या संदेशात म्हणाले की, अचूक निशाणा साधून पदकावर कोरलेले भारताचे नाव हा देशवासीय व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश अथक परिश्रम, मेहनत, संयम व जिद्दीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपली ही ऐतिहासिक कामगिरी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. या विजयामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना नवे प्रेरणास्थान मिळाले असून राज्य शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही मंत्री ॲड. कोकाटे यांनी नमूद केले आहे.