मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने जाहीर केला. या अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. दरम्यान, शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यामुळेच हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले, असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे साधारणतः वर्षातून तीन अधिवेशने होतात उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन यापैकी उन्हाळी अधिवेशन म्हणजेच साधारणतः राज्याच्या अर्थसंकल्पाचे अधिवेशन मानले जाते. त्यानंतर पावसाळी अधिवेशन असते तर हिवाळी अधिवेशन हे साधारणतः नागपूर येथे घेण्यात येते. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केले जाते, नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हे सत्र विधान भवन, नागपूर येथे आयोजित केल्या जाते, तर विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन मुंबई येथे होते.
महाराष्ट्र विधमंडळाचे येत्या 18 जुलैपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. हे अधिवेशन किती पुढे ढकलण्यात आले आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. विधिमंडळाने जारी केलेल्या पत्रकात केवळ हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र आता हे अधिवेशन 20 किंवा 25 जुलैपासून किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या पत्रकात जशी पुढची तारीख दिली नाही तसेच हे अधिवेशन अचानक पुढे का ढकलण्यात आले याबाबतही कोणतेही कारण दिले नाही. संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदीय कार्य विभागाकडून पुढील सूचना मिळताच अधिवेशनाची पुढची तारीख कळविण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.
दि. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, सध्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणं बाकी आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, मुख्य प्रतोद, राज्यपालांची भूमिका, अशा एकमेकांशी संबंधित असलेल्या राजकीय गुंतागुंतीचा पेच न्यायप्रविष्ट आहे. त्यातच अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पावसाळी अधिवेशनही पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
आता लांबलेले अधिवेशन पुढे ढकलेलं अधिवेशन 19 किंवा 20 जुलैपासून घेण्यात येईलष अशी शक्यता वर्तवली जात होती. या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र आता ती ही शक्यता फेटाळली आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अधिवेशन पुढे ढकलले का ? असा प्रश्नही यानिमित्त राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असून अनिश्चित काळासाठी पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले, त्यामुळे आता अधिवेशन केव्हा सुरु होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वेळचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येणार होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे हे अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात आले नव्हते. त्यामुळे विदर्भातील आमदारांकडून हे अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात यावे अशी मागणी होत होती. परिणामी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या मागणीला समर्थन दिले होते. तसेच यंदा नव्या सरकारने पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूर येथेच घ्यावे असे म्हटले आहे. आता अधिवेशनच पुढे ढकलल्याने नव्या सरकारचा निर्णय काय होतो याबाबत उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे यंदाचे पावसाळी अधिवेशन हे गाजणार असे दिसते. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकासआघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत जात नव्याने सरकार स्थापन केले. सहाजिक महाविकासआघाडीला विरोधात बसावे लागले. त्यामुळे या अधिवेशनात कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, रस्त्यांची दुरवस्था, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास, या मुद्द्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे.
Assembly Session Cabinet Expansion Postponed