मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या मुद्यावरून नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. राणे यांनी औरंगजेबाच्या मुद्यावरून आझमी यांच्याकडे हातवारे करत आरोप केले आणि त्यावरूनच दोघेही भिडले.
नितेश राणे यांनी यापूर्वीसुद्धा औरंगजेबाच्या मुद्यावरून विधान केले होते. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे फोटो स्टेटसवर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच मुद्यावरून आज नितेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिले.
नितेश राणे म्हणाले की, ‘धर्मवीर संभाजीराजेंविरोधात कट कारस्थान करणाऱ्या औरंगजेबाचे स्टेट्स ठेवून वातावरण खराब केले जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आहे. वंदे मातरम् म्हणत नाहीत, पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा औरंगजेब माझा बाप आहे, असे सांगणारे काही लोक आहेत. हे गद्दार लोक आहेत. हे मुद्दामबोलत असतात. औरंगजेब तुम्हारा बाप है म्हणतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात हे सुरू आहे.’ त्यावर अबू आझमी यांनी, काही मुस्लीम तरूणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले. माथा टेकवला. त्यांनी हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असं आव्हान दिलेलं. या देशात दोन कायदे चालतात का?, असा सवाल केला. ज्यांनी स्टेटस ठेवले त्यांच्यावर गुन्हा आणि जे आव्हान देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. चोवीस तास द्वेष पसरवला जातोय. त्यामुळे ट्रेनमध्ये गोळीबार झालाय. मुस्लीमांना हिंदुमध्ये बदनाम करायचं हे काम भाजप करतंय. संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. ट्रेनमध्ये बुरखा घालून, दाढी वाढवून फिरता येत नाही. मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदत करनेवाला नही है. नथुराम गोडसेचा फोटो लावतात. हे जाणुनबुजून केले जात आहे आणि त्यामुळे देशातील वातावरण खराब केले जात आहे, असेही ते म्हणाले.
अचानक स्टेटस कसे ठेवले जातात?
यापूर्वी कधी कोणत्याही मुस्लिम समुदायाकडून औरंगजेबाचे स्टेट्स ठेवणे, त्याचे उदात्तीकरण करणे किंवा फोटो काढून मिरवणूक काढणे असे झाले नाही. मग अचानक स्टेटस कसे ठेवले गेले? यामागे कोण आहे, जाणीवपूर्वक कोण तेढ निर्माण करत आहे, हे देखील सरकारला कळलेले आहे, ते सभागृहात सांगू शकत नाही, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
assembly session aurangzeb nitesh rane abu aazmi
Politics maharashtra monsoon