मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील पारंपरिक वैर सर्वांना माहिती आहे. राज्याच्या राजकारणात तर ते चांगलेच चर्चेत असते. स्थानिक निवडणुकांपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत कायमच या दोघांमधील भांडणाची चर्चा रंगत असते. विधानसभेत एका मुद्यावरून दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून जोरदार हशा पिकला.
राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांची इच्छा नसेल तरी त्यांना प्रश्नांच्या निमित्ताने संवाद साधावाच लागतो. बुधवारी त्यांनी सभागृहात बरेच प्रश्न उपस्थित केले आणि जवळपास सगळेच प्रश्न वाळू लिलावाच्या संदर्भात होते. त्यावर विखे-पाटलांनी उत्तरेही दिली. पण एक प्रश्न विचारला की त्यावर एक उत्तर आणि त्या उत्तरावर आणखी एक प्रश्न आणि मग पुन्हा त्याचे उत्तर… अशी मालिकाच दोघांनी लावली. दोघांमध्ये सुरू असलेला प्रश्न-उत्तरांचा सामना सभागृहात सारेच लोक ऐकत होते. त्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केली आणि दोघांनाही एकत्र बसून प्रश्न मार्गी लावण्याचा सल्ला दिला.
मुळात दोघांमधील हा सामना बघून सभागृहातील सदस्य कंटाळले होते. व्यक्तिगत वैरापोटी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येत होते. पण वाळू लिलावाचा प्रश्न मोठा असल्यामुळे अशोक चव्हाण उभे झाले. हा अत्यंत महत्त्वाचा आणि राज्यासाठी मोठा प्रश्न असल्यामुळे एकत्र बसून सोडविण्याचा सल्ला दिला. हा सल्ला स्वागतार्ह असल्याचे विखे-पाटलांनी मान्य केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली मध्यस्थी अधिकच रंजक ठरली.
वेगळाच प्रश्न निर्माण होऊ नये
अशोक चव्हाण यांनी विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना एकत्र बसून प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे दोघे एकत्र बसले तर वेगळाच प्रश्न निर्माण होऊ नये, अशी कोपरखळी केली आणि सभागृहात हशा पिकला.
assembly monsoon session radhakrishna vikhe patil balasaheb thorat
maharashtra politics congress minister bjp