मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या सुरुवातीचे कल आल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणार हे स्पष्ट झाले आहे. देशातील भाजपची लाट अद्याप कायम असल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. हे निकाल फक्त भाजपच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. विशेतः उत्तर प्रदेशमधील निकालाचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. केंद्रातील सत्तेत पोहोचण्यासाठी हा उपांत्य सामना होता, तो भाजपने जिंकला आहे. हा सामना जिंकताच भाजप आणि नरेंद्र मोदी यांचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊयात.
विधानसभा निवडणुकांमधील या विजयानंतर भाजप आता वाढलेल्या आत्मविश्वासासह २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागेल. मोदी यांच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत आहे हे मोदी जाणून आहेत. भाजपच्या विजयामुळे विरोधी पक्ष आणखी विखुरतील. त्यापैकी मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस आणखीनच कमकुवत झाली आहे. विरोधीपक्षांचा नेता होण्यासाठी आता ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्यापाठोपाठ अरविंद केजरीवाल पुढे येतील. यामुळे भाजपविरोधातील विरोधी पक्षांचा लढा कमकुवतच होणार आहे. त्यातच दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळालेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असे आपचे काही नेते बोलू लागले आहेत.
भाजपमध्ये आतापर्यंत मोदी-शाह या जोडीची चर्चा होती. आता योगी आदित्यनाथ हे आणखी एक नाव यात जोडले गेले आहे. आता मोदी-योगी-शहा अशी जोडी अस्तित्वात आली आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता प्राप्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची उंची आणखी वाढली असून, हिंदुत्वाचा मुद्दाही बळकट होणार आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा मोदी सरकारसमोर सर्वात मोठी डोकेदुखी मानली जात होती. परंतु उत्तर प्रदेशातील या विजयामुळे हा मुद्दाही मागे पडला आहे.