इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी२० चे यशस्वी आयोजन केले म्हणून जगभरात त्यांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांना अडचणीत आण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी कामाला लागली आहे. त्यांच्या या प्रयत्नात आसामचे मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अलीकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचे आरोप लावले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला केंद्र सरकारचे अनुदान मिळाल्याचा आरोप केला. त्याला बिस्वा यांनी उत्तर दिले. मात्र या आरोपाचे पडसाद आसामच्या विधानसभेत उमटताना दिसले. हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित कंपनीला केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याच्या आरोपांबाबत चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
याप्रकरणी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती.विधानसभा अध्यक्ष विश्वजित दैमारी यांनी स्थगन प्रस्तावाबाबतची काँग्रेसची मागणी फेटाळली. तसेच स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यासारखा हा मुद्दा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांसह माकपचा एक सदस्य आणि अन्य एका अपक्ष उमेदवाराने सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.
तर राजकारणातून निवृत्ती
त्यांच्या पत्नीने केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून कोणतीही रक्कम घेतलेली नाही. याबाबतचे पुरावे दिल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्तीसह कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे, या शब्दांत बिस्वा यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
Assam CM Hemant Biswa Sarma Wife Allegation Assembly