इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबाबत अजब दावा केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरे सल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या दाव्यामुळे शिवभक्तांमध्ये खळबळ उडाली असून देशात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवभक्तांसाठी १२ ज्योतिर्लिंग सर्वाधिक पुजनीय ठिकाणे आहेत. देशाच्या विविध भागांत ही १२ ज्योतिर्लिंग स्थापन आहेत. त्यापैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. यात परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ यांचा समावेश आहे. पण, आता आसाम सरकारने वेगळाच वाद उकरून काढलाय. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात देशातील सहावे ज्योतिर्लिंग आसामच्या कामरुप डाकिनी पर्वतात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीत विविध ज्योतिर्लिंगस्थळांची यादी देखील देण्यात आली त्यात भीमाशंकरच्या नावापुढे ‘डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे.
विरोधकांची टीका
विरोधकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिर हे आसाममध्ये आहे, असा दावा करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, मागणी विरोधकांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या तिरावर असल्याचा स्पष्ट उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये असल्याचे म्हटले आहे. आसाममध्ये भीमा नदीच नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….! pic.twitter.com/0hsHvm8sqO
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
इथे आहे भीमाशंकर
पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात सह्याद्री पर्वतावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. देशातील हे सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असून येथील शिवलिंगाचा आकार खूप मोठा आहे. शिवपुराणातील कथेनुसार शिव आणि दैत्य त्रिपुरासूर यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे भीमा नदी कोरडी पडली होती. मात्र, त्यानंतर शिवाच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असे सांगितले जाते.
Assam CM Controversial Statement on Bhimashankar Jyotirling