नवी दिल्ली – आपल्याकडे असे म्हणतात की, नावात काय आहे? त्यामुळे नाव बदलले म्हणून काय झाले? अहो ! पूर्वीची आपली फेसबुक कंपनी ही आता मेटा या नावाने ओळखले जात आहे. या कंपनीने आशियातील सर्वात मोठे ऑफिस भारतात उघडले असून कोट्यावधी व्यावसायिक, उद्योजक, निर्मात्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे.
या कंपनीने आशियातील पहिले कार्यालय स्वतंत्र सुविधेसह गुरुग्राम, दिल्ली एनसीआर येथे हे सुरू केले आहे. हे कार्यालय तब्बल 1 लाख 30 हजार चौरस फूट क्षेत्रफळावर बांधले आहे. सेंटर फॉर फ्युलिंग इंडियाज न्यू इकॉनॉमी देखील याच कार्यालयात असेल. कंपनीने पुढील तीन वर्षांत 10 दशलक्ष छोटे व्यावसायिक आणि उद्योजक आणि 250,000 निर्मात्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मेटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, कंपनीचे तंत्रज्ञान हे उद्योजकतेला चालना देत आहे आणि गुंतवणूक आणि आर्थिक वाढीला चालना देत आहे. सी- एफआयएनई सारखे उपक्रम, तसेच तंत्रज्ञानाने उद्योजकता आणि नवनिर्मितीला चालना दिली आहे आणि देशभरातील तरुणांना सशक्त केले आहे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील आणि इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची शक्ती हीच असली पाहिजे.
फेसबुक इंडिया (मेटा) कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले की, आमच्याकडे देशातील सर्वात मोठी टीम असेल. बदलामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी हे कार्यालय खुले असेल. मेटा तंत्रज्ञानाच्या जगात नवनवीन प्रयोग करणार आहे. त्याद्वारे एआर आणि व्हीआर सारख्या तंत्रज्ञानाच्या वापराला शिक्षण, अभ्यास, अर्थशास्त्र आणि आरोग्य सुविधांच्या दिशेने प्रोत्साहन दिले जाईल. हे केंद्र महिला आणि मुलांच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करेल.
फेसबुक नावाने भारतात मेटा वर्ष 2006 सुरू झाले. कंपनीची सुरुवात हैदराबादमध्ये फक्त एका अॅपने झाली. त्यावेळी कंपनीचे 15 दशलक्ष अॅप वापरकर्ते होते, आता त्यांची संख्या 400 दशलक्ष झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप्स मेटा अंतर्गत काम करतात. C-FINE सह META एक अब्ज भारतीयांना कौशल्य देईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.