आशियाई स्पर्धा, चीन
नाशिकचे पंचरत्न
आणि
कर्तृत्ववान प्रशिक्षक
येत्या २३ तारखेला चीन मधील हॅंगझाऊ येथे २३ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत ज्यात भारतासह एकूण ४५ देशातील सुमारे १०००० खेळाडू ४० विविध खेळात सहभागी होत आहेत. भारत एकूण ३९ खेळात ६५५ खेळाडूंसह भाग घेत आहे आणि त्यातील तब्बल पाच खेळाडू आणि एक प्रशिक्षक हे नाशिकमधील आहेत ही नाशिकसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा नाशिकसाठी विक्रम आहे. या पूर्वी कविता राऊत ( २०१० आणि २०१४ आणि संजीवनी जाधव२०१८ यांनी आशियाई खेळात नाशिकचे नाव उज्वल केले होते ) .नाशिकमधील क्रीडा संस्कृती झपाट्याने विकसित होत आहे याचेच हे द्योतक आहे असे म्हंटले पाहिजे.
या स्पर्धा खरं तर एक वर्षापूर्वीच याच ठिकाणी होणार होत्या पण चीनमध्ये ऐनवेळी करोनाची नवी लागण आली आणि आशियाई स्पर्धा एक वर्षभर पुढे ढकलण्यात आल्या. त्या आता बरोबर वर्षानंतर त्याच ठिकाणी सुरु होत आहेत. एकूण १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सांगता ऑक्टोबर आठ रोजी होत आहे आणि त्या तारखेपर्यंत विशेष म्हणजे यात खेळणाऱ्या नाशिकमधील सहा पैकी काही जणांनी एखादे तरी पदक किंवा पदके निश्चित मिळविले असेल असे या क्षेत्रातील जाणकार म्हणतात ! नाशिकची मान गौरवाने उंचविणारे हे पाच खेळाडू आणि त्यांचा सहभाग असलेले खेळ आहेत विदित गुजराथी ( बुद्धिबळ ), मृण्मयी साळगावकर ( रोइंग ), सिध्दार्थ परदेशी ( डायविंग ), आकाश शिंदे ( कबड्डी ) आणि सर्वेश कुशारे ( उंच उडी ) तर प्रशिक्षक आहेत शैलजा जैन ( कबड्डी ) ..
आता प्रत्येकाचा थोडक्यात परिचय आणि पदक मिळण्याच्या शक्यता याचा सविस्तर आढावा घेउ या :
विदित गुजराथी
जागतिक पातळीवर रॅंकींग मध्ये २९ व्या क्रमांकावर आणि भारतात ४ थ्या क्रमांकावर असलेला विदित भारतीय संघाच्या ५ खेळाडूच्या पुरुषांच्या चमूचा कर्णधार आहे ( इतर खेळाडू : प्रद्न्यानानंद , अर्जुन एरिगिअसी , पेंटल्या हरिकृश्न आणि जी गुकेश ) आणि तो आणि बाकी चार जण भारताला सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात कोणते ना कोणते पदके मिळवून देण्याची शक्यता निश्चित आहे .
आज भारत जगातील अव्वल संघ आहे आणि वरील पाचही खेळाडू जगातील पहिल्या ३० मध्ये आहेत. भारताला चीन कडून जास्त धोका आहे .
वैयक्तिक स्पर्धात ज्या २५ मि च्या रॅपिड पध्दतीने होणार आहेत त्यात विदित आणि अर्जुन खेळणार आहेत तर क्लासिकल पध्दतीने होणाऱ्या म्हणजे आरामात चालणाऱ्या ( ९० मि ४० चाली ) स्पर्धेत पाचही जण गरजेनुसार खेळतील. येथेही भारत काही अनपेक्षित घडले नाही तर पदक घेउन येणार हे निश्चित !
यापूर्वी दोनदा आशियाई खेळात बुद्धिबळ खेळले गेले ( २००६ आणि २०१० ) त्यात भारताने दोन सुवर्ण आणि २ कांस्य पदके जिंकली होती .
भारताचा महिला संघ ही तितकाच तुल्यबळ आहे आणि तोही पदके मिळविणार असे वाटते …
२०२०:साली विदीतच्या नेतृत्वाखाली भारताने ऑनलाईन चेस ऑलिंपियाड रशियासह संयुक्तरित्या जिंकले होते हे लक्षात घेतले पाहिजे .
मृण्मयी साळगावकर
अवघ्या २१ वर्षे वयाच्या मृण्मयीने आपली उत्तम अशी शैक्षणिक कारकीर्द ( बारावी ला ९२% गुण ) सोडून रोइंग या प्रकारात स्वतःला वाहून घेतले . नाशिकच्या वाटर्स एज या क्लब कडून राष्ट्रीय प्रशिक्षक अंबादास तांबे यांच्याकडे रोइंगचे प्राथमिक शिक्षण घेउन तिने सिंगल स्कल या प्रकारात राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे तिची भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूत निवड झाली जेथे ती चार वर्षांपासून हैदराबाद येथील सराव शिबिरात सराव करीत आहे . तिचे सातत्य आणि निष्ठा यामुळे तिची आशियाई खेळासाठी भारतीय संघात निवड झाली आहे .
तिचा आवडता प्रकार सिंगल आणि डबल स्कल्स असला तरीही आगामी आशियाई स्पर्धेत ती कॉक्सलेस फोर आणि कॉक्स्ड एट या प्रकारात ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे .
या स्पर्धा सप्टेंबर २० ते २५ या दरम्यान होत आहेत .
सर्वेश कुशारे
नाशिकमधील देवरगाव सारख्या खेड्यातून आलेल्या आणि हाय जंप सारख्या खेळात थेट भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २७ वर्षीय सर्वेशची कहाणी अतिशय अदभुत आहे .
त्याचे पहिले प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी त्याला हाय जंपिंगची अत्याधुनिक सुविधा देवरगाव सारख्या गावात नसूनही मिळेल त्या बांबूचा स्टॅन्ड उभा करून वाळलेले गवत आणि गवताचे चिपाड यांच्यावर सर्वेशकडून उंच उड्या मारण्याचा सराव करून घेतला.त्याची जिद्द , चिकाटी आणि हाय जंप मधील कौशल्य त्याला पुण्यातील आर्मीच्या संघात निवड होण्यासाठी उपयुक्त ठरले आणि त्याचे आयुष्य बदलले ते कायमचेच ! आज तो भारतातील अव्वल हाय जंपर आहे . त्याने अलीकडेच आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत २:२५ मी उडी मारून रौप्यपदक जिंकले आहे . त्यामुळेच हॅंगझाऊ येथेही तो सुवर्णपदक किंवा रौप्यपदकाचा दावेदार आहे असे म्हणता येइल .
त्याची उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी २:२७ मी आहे आणि त्याने ध्येय ठेवले आहे ते २:३० मी चे . येत्या २ ऑक्टोबर रोजी ( पात्रता फेरी ) आणि ४ ऑक्टोबरला अंतिम फेरीत तो कोणते पदक जिंकतो याकडे नाशिकमधीलच नव्हे तर भारतातील क्रीडा शौकीनांचे लक्ष लागले आहे !
आकाश शिंदे
ऑक्टोबर २ रोजी आशियाई स्पर्धेत कबड्डी स्पर्धा होतील आणि त्यात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नाशिकमधील आकाश शिंदे हा पहिला पुरुष कबड्डीपटू असेल . यापूर्वी नाशिकचा एकही पुरुष खेळाडू भारताच्या संघाकडून खेळलेला संधी नाही . ( अनुराधा डोणगावकर ही नाशिकची महिला खेळाडू मात्र तीन देशांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत खेळलेली पहिली आणि एकमेव खेळाडू ) नाशिकच्या आडगाव येथील ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब चा हा उंचापुरा खेळाडू आपल्या धारदार आणि पल्लेदार चढायासाठी प्रसिद्ध आहे . पुणेरी पलटण या संघाचा प्रो कबड्डीतील मह्त्वपूर्ण खेळाडू आहे . आक्रमणाबरोबर तो चांगल्यापैकी बचावपटूही आहे त्याच्या या अष्टपैलूत्वामुळेच तो भारताच्या संघात निवडला गेला आहे यात शंकाच नाही ! भारतीय संघाला मागील जाकार्ता येथील आशियाई स्पर्धेत जरी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरीही यावेळी पूर्ण तयारीत असलेला भारतीय संघ सुवर्णपदकाचा दावेदार आहे आणि त्यामुळे २२ वर्षीय आकाश हाही त्या यशाचा एक मह्त्त्वाचा घटक असेल का हे समजण्यास आपल्याला ७ ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे !
सिध्दार्थ परदेशी
१९८५ साली नाशिकला स्वा सावरकर तलाव सुरू झाला आणि स्विमिंग या प्रकारात नाशिकचे खेळाडू चमकू लागले . तथापि प्रचंड स्पर्धेत नाशिकचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र जास्त चमकु शकले नाहीत.
डायव्हिंग या प्रकारात तर वीराज आणि स्वराज पाटील नंतर सिध्दार्थ परदेशीच नाव घ्यावे लागेल . सिध्दार्थ सुरुवातीला वर्षभर नाशिक रोडच्या जिजामाता पूल वर सराव केल्यानंतर त्याने पुणे गाठले आणि आर्मीच्या संघातून त्याची गुणवत्ता बघून त्याने सरळ भारतीय संघात आपले स्थान मिळविले आणि पक्के केले . भारतातर्फे तो आशियाई , कॉमनवेल्थ इ स्पर्धांमध्ये सातत्याने डायव्हिंगमध्ये स्प्रिंगबोर्ड , हायबोर्ड आणि सिंक्रोनाइज्ड या प्रकारात उत्तम कामगिरी करीत आहे . येत्या आशियाई स्पर्धेतही तो ३० सप्टेंबर पासून ४ ऑक्टोबर पर्यंत वरील तीनही प्रकारात आपले कौशल्य दाखविणाऱ आहे आणि त्याच्यामते भारताला पदक मिळण्याची शक्यता ५०-५० टक्के आहे !
स्पर्धा चीन , कोरिया आणि जपान यांच्याशी आहे हे तो जाणतो !
शैलजा जैन
नाशिकच्या रचना स्पोर्ट्स क्लब च्या मुलींच्या कबड्डी संघाला भारतीय पातळीवर नेउन आणि विजेतेपदही मिळवून देणार्या प्रसिद्ध प्रशिक्षक शैलजा जैन यांचे वय जरी आज ६८ असले तरीही त्यांची जिद्द आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे . तसेच महिला कबड्डीपटूना त्यांचे वैशिष्ट्य, पक्के आणि कच्चे दुवे हेरून घडविण्याची जी कला आहे तिला दाद दिलिच पाहिजे !
हेच गुण त्यांना इराणचा महिला संघ घडविण्यासाठी उपयोगी पडले ज्याद्वारे त्यांनी २०१८ साली अतिशय बलाढ्य अशा भारतीय संघाला आशियाई स्पर्धेत अंतिम सामन्यात पाणी पाजले आणि एका रात्रीत प्रसिद्धीचा झोत या प्रसिद्धीपासून कायम दूर राहाणाऱ्या प्रशिक्षकावर पडला ! आता याही वेळी इराणने पुन्हा एकदा महिला संघ त्यांच्याच ताब्यात दीला आहे पण जैन यांनी इराणचा संघ उत्तम आणि पदकाचा दावेदार असला तरीही चमत्कार पुन्हा पुन्हा घडत नसतात याची जाणीव खेळाडूना आणि संघ व्यवस्थापनाला आधीच देउन ठेवली आहे ! तरीही बलदंड आणि उंच्यापुऱ्या इराणी महिला पुन्हा एकदा चमत्कार करतील आणि प्रशिक्षक शैलजा जैन यांना सुवर्णपदक नाहीतरी रौप्य किंवा कांस्यपदक तरी भेट देतीलच असा आत्मविश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे !
दीपक ओढेकर – लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत. मो. 9422770532
Asian Games China Nashik Sports Players Deepak Odhekar