दीपक ओढेकर, नाशिक
येत्या २३ तारखेला चीन मधील हॅंगझाऊ येथे २३ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत ज्यात भारतासह एकूण ४५ देशातील सुमारे १०००० खेळाडू ४० विविध खेळात सहभागी होत आहेत. भारत एकूण ३९ खेळात ६५५ खेळाडूंसह भाग घेत आहे आणि त्यातील तब्बल पाच खेळाडू आणि एक प्रशिक्षक हे नाशिकमधील आहेत ही नाशिकसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा नाशिकसाठी विक्रम आहे.
या पूर्वी कविता राऊत ( २०१० आणि २०१४ आणि संजीवनी जाधव२०१८ यांनी आशियाई खेळात नाशिकचे नाव उज्वल केले होते ) .नाशिकमधील क्रीडा संस्कृती झपाट्याने विकसित होत आहे याचेच हे द्योतक आहे असे म्हंटले पाहिजे. या स्पर्धा खरं तर एक वर्षापूर्वीच याच ठिकाणी होणार होत्या पण चीनमध्ये ऐनवेळी करोनाची नवी लागण आली आणि आशियाई स्पर्धा एक वर्षभर पुढे ढकलण्यात आल्या. त्या आता बरोबर वर्षानंतर त्याच ठिकाणी सुरु होत आहेत.
एकूण १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सांगता ऑक्टोबर आठ रोजी होत आहे आणि त्या तारखेपर्यंत विशेष म्हणजे यात खेळणाऱ्या नाशिकमधील सहा पैकी काही जणांनी एखादे तरी पदक किंवा पदके निश्चित मिळविले असेल असे या क्षेत्रातील जाणकार म्हणतात.
नाशिकची मान गौरवाने उंचविणारे हे पाच खेळाडू आणि त्यांचा सहभाग असलेले खेळ आहेत विदित गुजराथी ( बुद्धिबळ ), मृण्मयी साळगावकर ( रोइंग ), सिध्दार्थ परदेशी ( डायविंग ), आकाश शिंदे ( कबड्डी ) आणि सर्वेश कुशारे ( उंच उडी ) तर प्रशिक्षक आहेत शैलजा जैन ( कबड्डी ) ..
Asian Games China 2023 Nashik Players Coach Selection