इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषकामध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. हा संघ आपला पुढचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेत्यांविरुद्ध खेळणार आहे, मात्र रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याला दुजोरा दिला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक आयोगाने (बीसीसीआय) प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, “सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. अक्षर पटेलची संघातील ‘स्टँडबाय’ खेळाडूंपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे, तो लवकरच दुबईत संघात सामील होणार आहे.
रवींद्र जडेजाची स्पर्धेच्या मध्यावर दुखापत होणे ही भारतासाठी चांगली बातमी नाही. जडेजा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात 35 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकात 15 धावा देत 1 बळी घेतला.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतासाठीही हा मोठा धक्का आहे. कारण आशिया कप संपल्यानंतर काही दिवसांनी बीसीसीआय जागतिक संघाची घोषणा करणार आहे. मात्र, जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. रविवारी भारताला सुपर फोरचा पहिला सामना खेळायचा आहे.
भारतीय संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
Asia Cup Indian Team Player Replace Injured
Axar Patel Ravindra Jadeja Cricket