इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून असलेल्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. टीम इंडिया आता या स्पर्धेत बाहेर जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे, तरीही या संघाला एक संधी मिळण्याची शक्यता आहे, अर्थात त्यासाठी पाकिस्तानचा संघ पुढील दोन्ही सामने हरला तरच हे शक्य होणार आहे. अफगाणिस्तान बरोबर भारतीय संघाला संधी मिळाल्यास या स्पर्धेत भारत टिकून राहण्याची शक्यता आहे. अर्थात हा केवळ एक आशेचा किरण आहे.
श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. पाकिस्तानच्या खात्यात १ विजय आहे आणि त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. पाकिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्याशी खेळायचे आहे. यापैकी एक सामना जिंकल्यास पाकिस्तान अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान- श्रीलंका यांच्यात जेतेपदाची लढत होईल. पण, भारताला अजूनही एक संधी आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने गमावल्यास आणि भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास, सुपर ४ मधील उर्वरित तीन संघांचे प्रत्येकी एक विजय होतील. अशात ज्याचा नेट रन रेट चांगला असेल तो संघ अंतिम फेरीत जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा नेट रन रेट ०.१२६ असा, तर अफगाणिस्तानचा -०.५८९ असा आहे. भारताचा नेट रन रेट -०.१२५ झाला आहे.
नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांमध्ये कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. पण, युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत भारताच्या आशा पल्लवीत केल्या. त्यात आर अश्विननेही १ विकेट्सची भर टाकली. बिनबाद ९७ वरून श्रीलंकेची अवस्था ४ बाद १११ धावा अशी झाली होती. पण,२ चेंडूंत २ धावा हव्या असताना रिषभ पंत व अर्शदीप सिंग यांच्याकडून रन आऊटची संधी हुकली अन् श्रीलंकेने बाजी मारली.
भारताकडून रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने ३४ धावा केल्या. हार्दिक पांड्या (१७), रिषभ पंत (१७) व दीपक हुडा (३) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात कुसल मेंडिस (५७) व पथूम निसंका (५२) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी ३४ चेंडूंत नाबाद ६४ धावा करून ६ विकेट्स राखून विजय मिळवला. शनाका १८ चेंडूंत ३३ धावांवर, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला. आणि श्रीलंकेने विजय मिळवून आशिया चषक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले, तर भारताची मोठी निराशा झाली आहे.
Asia Cup Indian Cricket Team Chances for Final Match