मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ३० ऑगस्टपासून हा चषक सुरू होईल. भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार आहे. हा उत्कंठावर्धक सामना श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. पाकिस्तान यजमान आहे, पण बीसीसीआयने तिथे आपला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. या कारणास्तव पाकिस्तानला ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करावी लागली आहे. या चषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ एकूण तीनवेळा आमने सामने येतील. यातील तिसरा सामना जिंकणाराच विजेता ठरणार आहे.
आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये तर नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. मुलतानमध्ये एक आणि लाहोरमध्ये तीन सामने होणार आहेत. त्याचवेळी श्रीलंकेच्या कॅंडीमध्ये तीन सामने आणि कोलंबोमध्ये अंतिम सामन्यासह सहा सामने होतील. साखळी फेरीतील एक सामना मुलतानमध्ये, दोन सामने लाहोरमध्ये आणि तीन सामने कॅंडीमध्ये होणार आहेत. त्याचबरोबर सुपर-४ चा एक सामना लाहोरमध्ये तर पाच सामने कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेतील सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यजमान पाकिस्तानसह भारत आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. २ सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना केल्यानंतर भारत ४ सप्टेंबरला कँडीतच नेपाळशी खेळणार आहे. तर ब गटातील पहिला सामना ३१ ऑगस्ट रोजी कँडी येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. यानंतर ३ सप्टेंबरला लाहोरमध्ये बांगलादेशचा संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे. याच मैदानावर ५ सप्टेंबरला अफगाणिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
स्पर्धेच्या नियमांनुसार, दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरतील. भारताच्या गटात पाकिस्तान आणि नेपाळ आहेत. अशा स्थितीत टीम इंडिया पुढची फेरी गाठेल, असे मानले जात आहे. पाकिस्तानचीही तीच स्थिती आहे. अशा परिस्थितीत १० सप्टेंबर रोजी कोलंबो येथे दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. अ गटातील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील संघांमध्ये हा सामना होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जर पाकिस्तान आणि भारत गट A मध्ये अव्वल दोन संघात स्थान मिळवले तर पाकिस्तान A1 आणि भारत A2 म्हणून गणला जाईल.
जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सुपर-४ मध्ये चमकदार कामगिरी केली तर १७ सप्टेंबर रोजी दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडतील. यासाठी दोन्ही संघांना सुपर-४ फेरीत अव्वल दोनमध्ये राहावे लागेल. जर भारत-पाकिस्तान संघ अव्वल दोनमध्ये स्थान मिळवले तर चाहत्यांना कोलंबोमध्ये रोमहर्षक अंतिम सामना पाहण्याची संधी मिळू शकते.