इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे आता साखळी, सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या दोन्ही संघात रविवारी २८ सप्टेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशसमोर १३६ धावांचे आव्हान ठेवलं होते. मात्र बांगलादेशला १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने ११ धावांनी हा सामना जिंकला.
या सामन्यात बांगलदेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंग दिली. पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १३५ धावा केल्या. बांगलादेशसाठी तास्किन अहमद याने ३ विकेट्स मिळवल्या. मेहदी हसन आणि रिषाद हौसेन या दोघांनी २-२ विकेट्स मिळवल्या. तर मुस्तफिजुरने १ विकेट मिळवली. त्यानंतर बांगलादेशने फलंदाजी केली. पण, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केल्यामुळे ११ धावांनी बांगलादेशला पराभव स्विकारावा लागला. बांगलादेशकडून शमीम होसैन याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. शमीमने सर्वाधिक ३० धावा केल्या.
सैफ हसन याने १८ धावा केल्या. तर नुरुल हसन आणि रिशान होसैन या दोघांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. मेहदी हसन याने ११ धावा तर तंझीम साकिबने १० धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानसाठी शाहीन अफ्रिदी आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स मिळवल्या. सॅम अयुबने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद नवाझ याने १ विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता पाकिस्तान अंतिम सामना टीम इंडियाबरोबर होणार आहे. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आता अंतिम सामन्यातही हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहे. या सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.