इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने भिडले. या दोन्ही संघात झालेला अंतिम सामना चुरशीचा झाला. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर अंतिम सामन्यातही भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप पटकावला. भारताने ५ गडी आणि २ चेंडू राखून पाकिस्तानला धूळ चराली. या विजयासह आशिया कप स्पर्धेत नवव्यांदा नाक कोरलं तसेच गटविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. पण, या अंतिम सामन्याच्या विजयानंतर प्रेझेंटनश सेरेमनीत टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॅाफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा संघाला ट्रॅाफी न घेताच संपला. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळा पोस्ट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटले की टीम इंडियाचे अभिनंदन खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच..विजय..आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा….
या अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी १४७ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान २ चेंडूआधी ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले टीम इंडियाने १९.४ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. टीम इंडियाच्या या विजयात तिलक वर्मा, शिवम दुबे व्यतिरिक्त संजू सॅमसन याने बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. गेल्या ३ सामन्यांमध्ये अर्धशतकाची हॅटट्रिक लगावणारा अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरला. अभिषेक दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर ५ रन्सवर आऊट झाला. कॅप्टन सूर्याने पुन्हा निराशा केली. सूर्याने १ धाव केली. तर उपकर्णधार शुबमन गिल १२ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची ४ ओव्हरनंतर ३ आऊट २० अशी स्थिती झाली. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र अब्रार अहमद याने ही जोडी फोडली. अब्रारने संजूला आऊट करत ही जोडी फोडली. तिलक-संजूने चौथ्या विकेटसाठी ५७ रन्सची पार्टनरशीप केली. संजूने २१ बॉलमध्ये २४ रन्स केले. संजूनंतर तिलकची साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला. तिलक आणि शिवम जोडीने निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने फटकेबाजी करत टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला. या जोडीला भारताला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र शिवम निर्णायक क्षणी आऊट झाला. शिवमने २२ बॉलमध्ये २ सिक्स आणि २ फोरसह ३३ रन्स केले.
शिवमनंतर रिंकु सिंह मैदानात आला. रिंकु मैदानात आला तेव्हा भारताला १० धावांची गरज होती. तिलकने यापैकी काही धावा केल्या. तर रिंकुने त्याच्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजयी केलं. रिंकु ४ धावांवर नाबाद परतला. तर तिलकने ५३ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक आणि नाबाद ६९ धावा केल्या. पाकिस्तानसाठी फहीम अश्रफ याने ३ विकेट्स मिळवल्या. तर अब्रार आणि शाहिन आफ्रिदी या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
त्याआधी कॅप्टन सूर्याने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी टॉप ३ फलंदाजांनी उल्लेखनीय खेळी केली. पण, टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कमाल करत पाकिस्तानला १९.१ ओव्हरमध्ये १४६ रन्सवर ऑल आऊट केले त्यानंतर भारताने हे आव्हान २ चेंडूआधी ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. टीम इंडियाने १९.४ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १५० धावा केल्या.
