नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील नाशिक-पुणे महामार्गावरील ख्रिश्चन बांधवांचे प्रसिद्ध जगभर असलेले बाळ येशू चर्चची यात्रा याही वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबाबतचे माहिती फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. येथे दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या शनिवारी व रविवारी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी देशभरातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोना संकटामुळे यावर्षी ची यात्रा ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी मंदिर प्रशासनाने श्राईन ऑफ दि इन्फन्ट ही लिंक भाविकांना पाठविण्यात आली आहे. त्यावर १३ फेब्रुवारीपर्यंत मराठी, इंग्रजी, कोकणी, मलाळ्याम आदी भाषांमध्ये भाविकांसाठी ऑनलाईन मिसा (विशेष प्रार्थना) घेतली जाणार आहे.
दरम्यान, १३ फेब्रुवारी पर्यंत दररोज एक फादर मिसा घेणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीनुसार यात्रा ऑनलाईन भरविण्याचा निर्णय बाळ येशू मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. १३ फेब्रुवारी पर्यंत आणि शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बाळ येशू मंदिर व परिसरात भाविकांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाळ येशूकडे केलेला नवस पूर्ण होतो अशी श्रध्दा असल्याने ही यात्रा देश-विदेशात प्रसिध्द आहे. दोन वर्षांपासून करोनाचे संकट कायम असल्याने फादर एरल फर्नांडिस यांनी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन यात्रा ऑनलाईन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत फलक मंदिर परिसरात लावण्यात आले.