नाशिक – माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया यांच्यासह ५ जणांविरोधात २४ कोटींच्या फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अशोका ग्रुपच्या अधिकृत वकिलांनी खुलासा केला आहे.
अशोका ग्रुपच्या अधिकृत वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, अशोका ग्रुप हा कायदेशीर व स्वच्छ व्यवहारांवर भरवसा ठेवतो. ही केस अगोदरच न्यायालयातून रद्दबातल झालेली होती. उलटपक्षी या केस मध्ये आमचीच फसवणूक झालेली आहे. प्रत्यक्षात सर्वांनाच माहित आहे की, यापुर्वी प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार माजी खासदार ईश्वरलाल जैन हे आर्थिक अडचणीत असल्याचे दिसून येत होते. अनेक बँकांनी त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावल्याचे वृत्त आपणास ज्ञातच आहे. ते आपल्या संपर्काचा वापर करुन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर भरवसा आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, हा पूर्ण विश्वास आहे. आमच्या चारित्र्यहननाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अशोका ग्रुपच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.