नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अवघ्या ३३ महिन्यांत देशातील पहिल्या आठ मार्गिका (लेन) असलेल्या नदीवरील पुलाची उभारणी करण्याची अशोका बिल्डकॉन लिमिटेडची अद्वितीय कामगिरी राष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरली आहे. कंपनीच्या या अजोड कामगिरीला कन्स्ट्रक्शन्स टाईम्स २०२३ पुरस्काराचे कोंदण लाभले आहे. ग्रेटर नोइडा (नवी दिल्ली) येथील इंडिया एक्स्पो सेंटर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात अशोका बिल्डकॉनच्या वतीने सुनील गोमसे यांनी पुरस्कार स्वीकारला.
गुणवत्ता आणि वेळेत पूर्ण केलेले प्रकल्प या आधारे आज `अशोका बिल्डकॉन लिमिटेड`ने आपली एक वेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. गुजरातमधील नर्मदा नदीवर देशातील पहिला आठ मार्गिका (लेन) असलेला पुल उभारण्यात आला. सदर पुलाचे बांधकाम देशात कोरोना महासाथीने थैमान घातले होते, त्या आव्हानात्मक काळात पूर्णत्वास नेण्यात आले. या काळातील दखलपात्र बाब म्हणजे नर्मदा नदीला दोनदा महापूर आला. मात्र जिद्द आणि कल्पकता यांच्या जोरावर प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली. `अशोका बिल्डकॉन’ने आजवर विक्रमी काळात विविध प्रकल्प उभारणी केली आहे. या प्रकल्प उभारणीतून कंपनीने आपली गौरवशाली परंपरा कायम राखली.
देशातील तब्बल २२ राज्यांमध्ये अस्तित्व असलेल्या ‘अशोका’चा डंका आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या त्रिखंडात आहे. रस्ते, महामार्ग आणि उड्डाणपूल उभारणी व्यतिरिक्त कंपनी इमारती, वीज वितरण, रेल्वे प्रकल्प, शहरी भागातील गॅस वितरण, स्मार्ट इंफ्रा, सौर ऊर्जा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांत कार्यरत आहे. नॅशनल स्टोक एक्सचेंज (एनएससी) आणि बॉम्बे स्टोक एक्सचेंज (बीएससी) मध्ये कंपनीची नोदंणी झालेली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल कर्मचारी वर्ग आणि कटिबद्धता या त्रिसूत्रीच्या जोरावर `अशोका बिल्डकॉन लिमिटेड`ने आपला सार्वत्रिक लौकिक राखला आहे. नर्मदा नदीवर पुलाची बांधणी करताना अडचणींची मालिका होती. तथापि, त्यावर मात करून आम्ही विक्रमी काळात पुलाची उभारणी करण्याची अद्वितीय कामगिरी बजावली. या यशाचे श्रेय आम्ही सांघिक कामगिरीला देतो.
– सतीश पारख, व्यवस्थापकीय संचालक, अशोका बिल्डकॉन लिमिटेड
Ashoka Buildcon Construction Times Award