नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते आणि पूल बांधणी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. कंपनीला बांगलादेशातील तब्बल ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा रस्ता निर्माण प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्प प्राप्तीमुळे अशोका बिल्डकॉन लिमिटेडने वैश्विक स्तरावर पाचव्या देशात आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा उमटविण्यात यश मिळवले आहे. या संदर्भातील करारावर अशोका बिल्डकॉनच्या वतीने आदित्य पारख यांनी स्वाक्षरी केली.
गेल्या काही वर्षांत अशोका बिल्डकॉनने पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रात अतुलनीय कामगिरीची नोंद करीत वैश्विक पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. भारताशिवाय बेनीन, मालदीव, गयाना आणि आता बांगलादेश या पाचव्या देशात रस्ता निर्माणाचे कंत्राट प्राप्त केले आहे. स्वदेशातील बहुतेक राज्यांमध्ये निर्धारित काळापेक्षा कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण करणारी कंपनी म्हणून अनेकदा ‘अशोका’ने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.
बांगलादेशातील नूतन प्रकल्पाचे कंत्राट मिळवताना ‘अशोका’ला चटगावमधील बराईरहात-हेन्को-रामगड रस्ता बांधणी करावी लागणार आहे. सदर प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबद्दल कंपनीच्या वतीने विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ashoka Buildcon Bangladesh Road Project Contract