नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैदिक काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य परंपरेमुळेच वेद, अध्यात्म आणि धर्म टिकून आहे. देश या परंपरेचा आणि वेदाभ्यासकांचा नित्य ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. सिंघल फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘भारतात्मा अशोकजी सिंघल वेद पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते.
फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा ‘भारतात्मा अशोकजी सिंघल वेदविद्यार्थी पुरस्कार’ पुण्याच्या गजानन कुलकर्णी यास प्रदान करण्यात आला. अथर्ववेदासाठी असलेला हा पुरस्कार ना. पीयूष गोयल यांच्या हस्ते आणि पू. स्वामी गोविन्ददेव गिरिजी यांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला. येथील चिन्मय मिशन सभागृहात हा सोहळा झाला. महावस्त्र, सन्मानचिन्ह आणि ३ लक्ष रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांच्या चार सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीवर नाशिकचे स्मार्त चूडामणि पं. शांतारामशास्त्री भानोसे आणि पुण्याचे वे.शा.सं. मोरेश्वर घैसास यांचा समावेश आहे.
वैदिक संस्कृती आणि वेदाध्ययनाला प्रोत्साहन देण्यासाठी फाउंडेशनतर्फे वेदविद्यार्थी, वेदाध्यापक आणि वेद विद्यालयांना राष्ट्रीय पातळीवर हे पुरस्कार दिले जातात. स्व. अशोक सिंघल यांच्या कुटुंबियांनी या ट्रस्टची स्थापना केली आहे. यंदाचा सर्वोच्च वेदार्पित जीवन भारतात्मा पुरस्कार तिरुपतीचे पं. मद्दुपल्लि सूर्यनारायण घनपाठी (५ लक्ष रुपये ) यांना प्रदान करण्यात आला. वेदाध्यापक पुरस्कार काँचीचे पं. कुमारगुरु घनपाठी यांना तर वेद विद्यालय पुरस्कार वाराणसी येथील पट्टाभिरामशास्त्री वेदमीमांसा अनुसंधान केंद्राला देण्यात आला. केंद्राचे अध्यक्ष पं. युगल किशोर मिश्र यांनी तो स्वीकारला. या सोहळ्याचे प्रास्ताविक सलिल सिंघल यांनी केले.
भारतात्मा अशोकजी सिंघल वेदविद्यार्थी पुरस्कार सन्मानित पंडित गजानन कुलकर्णी हे पुण्यातील ‘पुणे वेदशास्त्र विद्यालयाचे’ विद्यार्थी. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील निंबगावचे रहिवासी. पुण्यात वेदमूर्ती दुर्गादास अम्बुलगेकर यांच्या सान्निध्यात त्यांचे अथर्ववेदाचे सांग अद्ययन झाले. याच वेदांतील शिक्षा, ज्योतिष, निघन्टु, पाणिनी, अष्टाध्यायी आणि ग्रुह्यसूत्र या षड्-अंगांचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. सध्या ते अहमदनगर मधील श्रीदत्त देवस्थानम् सहाय्यक अध्यापक आहेत.
Ashok Singhal Ved Vidyarthi Award Ceremony