मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकारणात २०१९मध्ये ऐतिहासिक उलथापालथ होऊन शिवसेनेने थेट विरोधक काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधकांच्या भूमिकेमध्ये बसण्याची वेळ आली. मात्र, ही आघाडी २०१४ – २०१९ या काळातच होणार होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी शिंदेबांबतही मोठे विधान केल्याने राज्याच्या राजकारणात त्याची जोरदार चर्चा होत आहे.
“भाजपा – शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी मुंबईतील कार्यालयात येऊन माझी भेटदेखील घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचे सरकार स्थापन करायचे असेल तर तुम्ही आधी पवारसाहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं होतं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही,” असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, “मविआ सरकारच्या माध्यमातून शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवलं तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेत सहभागी होणे पसंत केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आला”, असंही ते म्हणाले. मात्र आता अशोक चव्हाणांनी जे विधान केले त्यावरून शिवसेनेने २०१९ च्या आधीपासूनच ही राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. चव्हाणांच्या या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
…म्हणून महाविकास आघाडीचा जन्म
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना – भाजपा युतीने एकत्रितपणे प्रचार करत लोकांना युतीसाठी मते मागितली. परंतु निवडणूक निकालात भाजपाच्या पूर्वीपेक्षा कमी झालेल्या जागा पाहून शिवसेनेने राजकीय खेळी खेळली. अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊ असा शब्द भाजपाने दिला होता. याच मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून शिवसेना – भाजपा यांच्यात बिनसलं. त्यानंतर शिवसेनेने विरोधक काँग्रेस – राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात ऐतिहासिक महाविकास आघाडी जन्माला आली.
Ashok Chavhan Big Statement About Eknath Shinde
Congress Politics Alliance