मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यानंतर या निवडणुकीत लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. पण, या निवडणुकीत ही टेस्ट फेल झाली. या निवडणुकीत ठाकरे गटाने २१ पैकी १९ तर मनसे २ जागा उत्कर्ष पॅनलतर्फे लढवल्या पण, यातील एकही जागा या पॅनलला जिंकता आली नाही. तर दुसरीकडे फारश्या चर्चेत नसलेल्या शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागा जिंकत पतसंस्थेवर वर्चस्व मिळवले. तर महायुतीच्या सहकार पॅनलला ७ जागा मिळाल्या. त्यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले असे म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे की, भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि “पत” आणि “पेढी”साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत आहे. बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे..तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “निर्भय”वक्त्यांपर्यंत…सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची!!
९ वर्षे या पतसंस्थेवर सत्ता
९ वर्षे या पतसंस्थेवर सत्ता असणा-या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एेन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची या निवडणुकीत एन्ट्री झाली. त्यामुळे हे पॅनल मतदानाच्या अगोदरच अडचणीत सापडले होते. एकीकडे ठाकरे बंधु व दुसरीकडे महायुतीचे तगडे पॅनल असतांना शशांक राव यांनी या निवडणुकीत २१ उमेदवार उतरवले होते. त्यापैकी १४ संचालक त्यांचे निवडून आले. त्यामुळे दोन्ही आघाड्यांना हा मोठा धक्का समजला जातो. पण, ठाकरे बंधुला एकही जागा जिंकता न आल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक धक्कादायक ठरली आहे.
ठाकरे बंधुचे पॅनल फेल
गेल्या चार वर्षापासून ही निवडणूक रखडली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर या दोन्ही ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट असल्याचे बोलले जात होते. पण, या टेस्टमध्ये ठाकरे बंधुचे पॅनल फेल ठरले. या निवडणुकीत शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली. त्यांनी प्रणि उत्कर्ष पॅनल तयार करुन त्यांच्या पोस्टरवर ठाकरे ब्रॅण्ड असे लिहले होते. तर दुसरीकडे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, निलेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेच्या किरण पावसरकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृध्दी पॅनल निवडणुकीत उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्सं युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनल यांनी २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते.
बेस्ट एम्प्लॅाईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निकाल
शशांक राव पॅनल -१४
महायुती पॅनल सहकार पॅनल – ६ (भाजप ४, शिंदे गट २)
मनसे – शिवसेना उत्कर्ष पॅनल -०
एससी- एसटी युनियन – १