मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील सरकारवर टिका करण्याची एकही संधी आशिष शेलार सोडत नाहीत. आता त्यांनी दिल्लीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या काळातील एक विशिष्ट्य फाईल ओपन होणार असल्याचे संकेत ट्विटद्वारे दिले आहेत.
ठाकरे सरकारच्या काळात दारूला आश्रय देण्यात आला. या काळात विदेशी दारुवरील कर माफ करण्यात आला. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत देण्यात आली. किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी देण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. २०२१-२२ च्या अबकारी धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील या घडामोडीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत असल्याची टिका शेलार यांनी केली आहे. दिल्ली सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेही दारूवाल्यांवर खैरात केली. त्यामुळे ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात असून लवकर ती फाईल ओपन होणार आहे, असे भाजपनेते शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
म्हणूनच केजरीवाल भेटीला ?
तत्कालीन ठाकरे सरकार आणि दिल्लीचे केजरीवाल सरकार यांची दारुवाल्यांच्या बाबतीत धोरणे सारखीच आहेत. त्यामुळेच केजरीवाल ठाकरे यांच्या भेटीला आले होते का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ विधानही केले होते. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं असलं तरीही उद्धव ठाकरेच वाघ असल्याचे ते माध्यमांपुढे म्हणाले होते.
सिसोदिया सीबीआय कोठडीत
मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टात त्यांना हजर करण्यात आले होते. शिक्षण धोरणामुळे आणि सरकारी शाळांच्या विकासामुळे केवळ भारतातच नव्हे तर बाहेरील देशांमध्येही पोहोचले होते. पण मद्य धोरणातील भ्रष्टाचार त्यांना आता महागात पडणार आहे.