मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे
विमा योजनेचे स्वरुप
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे. दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.
वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.
या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.
या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.