विशेष प्रतिनिधी, पुणे
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या विठुरायाच्या म्हणजेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाची आस सर्व वारकऱ्यांना लागली आहे. आषाढी वारी तथा आषाढी एकादशी यात्रा अवघ्या २० ते २५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, यंदाही मागील वर्षाप्रमाणेच वारकऱ्यांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन कोरोना संसर्गामुळे घेता येणार नाही तसेच वारीलाही जाता येणार नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे पालन करीत केवळ मानाच्या पालख्या आणि मोजक्याच वारकऱ्यांना यंदा दर्शन घेणे शक्य आहे. परंतु श्री शेत्र शेगाव येथील देवस्थानच्या नियमाप्रमाणे कार्य केल्यास सर्व वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्वच देवस्थान बंद आहेत. मात्र आता भाविकांना पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे सरकारने पंढरपूरचे मंदिर देखील बंद ठेवले आहे.
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व राज्य सरकारने ठरविले तर संपूर्ण महिनाभरात सुमारे ९० हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, असे मत वारकरी संप्रदायातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कोरोना संकट काळात देवदर्शनासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राबविलेला दर्शन पॅटर्न श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढ वारीत देखील राबविल्यास हजारो भाविक दर्शन घेवू शकतील. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करून दर्शनाची व्यवस्था करण्याचा पॅटर्न पंढरपुरात राबविण्याची मागणी वारकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.








