मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाने भारतातील काही राज्यांच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून हे चक्रीवादळ आता वायव्य दिशेने १६ किमी प्रति तास वेगाने पुढे सरकत आहे. असनी चक्रीवादळाचा वेग वाढत असल्याने ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या हे चक्रीवादळ असले तर येत्या काही तासांमध्ये ते तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळेच ११ आणि १२ मे हे दोन्ही दिवस विशेष सतर्कतेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांना यलो, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारपासून मुसळधार पाऊस आणि त्यानंतर जोरदार वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आजपासूनच बंगालच्या उपसागरात मच्छिमार व अन्य कुणीही जाऊ नये, असे हवामान विभागाने बजावले आहे. या चक्रीवादळाला श्रीलंकेने असनी हे नाव दिले आहे. चक्रीवादळ येणार असल्याने केवळ या तीनच नाही तर अन्य राज्यांमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात यास, सप्टेंबरमध्ये गुलाब आणि डिसेंबर जावाद चक्रीवादळ भारतात धडकले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1523165569943367681?s=20&t=cR9ybY6se3eLE6fDAzfvvw