मुंबई – क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात शाहरूख खान पुत्र आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आता मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी (२७ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. आज दुपारनंतर जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली. यात आर्यनचे वकील माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी आर्यनसाठी जोरदार युक्तीवाद केला. परंतु न्यायालयाच्या कामकाजाचा वेळ संपल्यामुळे इतर आरोपींच्या वकिलांचे युक्तीवाद तसेच एनआयएच्या वकिलांचा युक्तीवाद बुधवारी दुपारच्या सत्रात होणार आहेत.
तत्पूर्वी आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी शाहरूख खानने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली. मुकूल रोहतगी यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. रोहतगी म्हणाले, क्रूझवर जाताना आर्यनने तिकीट काढले नव्हते. त्याला निमंत्रित करण्यात आले होते. आर्यनने कोणतेही ड्रग्ज घेतल्याचे पुरावे सापडले नाहीत. त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाझच्या बुटात ड्रग्ज सापडले, त्याला आर्यन जबाबदार कसा? तरीही तो २० दिवसांपासून तुरुंगात आहे. अटक करण्यापूर्वी आरोपीची वैद्यकीय चाचणी केली जाते, परंतु आर्यनची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. यावरून आर्यनला टार्गेट केले जात आहे असे दिसून येत आहे.