मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खान पुत्र आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी स्थगित करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी (२७ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. आर्यनचे वकील माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी आर्यनसाठी जोरदार युक्तीवाद केला. परंतु न्यायालयाच्या कामकाजाचा वेळ संपल्यामुळे इतर युक्तीवाद बुधवारी होणार आहेत.
मंगळवारी झालेल्या युक्तीवादाबद्दल वकिलांनी सांगितले, की आज एकाच बाजूने युक्तीवाद झाला आहे. उद्या दुसर्या बाजूने युक्तिवाद होतील. बुधवारी दुसर्या सत्रात पुढील सुनावणी सुरू होईल. न्यायालयाने मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद ऐकला. रोहतगी यांनी तब्बल दोन तास आपला युक्तीवाद केला. आर्यन खान कसा निर्दोष आहे याबद्दल मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
रोहतगी म्हणाले, क्रूझवर जाताना आर्यनने तिकीट काढले नव्हते. त्याला निमंत्रित करण्यात आले होते. आर्यनने कोणतेही ड्रग्ज घेतल्याचे पुरावे सापडले नाहीत. त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाझच्या बुटात ड्रग्ज सापडले, त्याला आर्यन जबाबदार कसा? तरीही तो २० दिवसांपासून तुरुंगात आहे. अटक करण्यापूर्वी आरोपीची वैद्यकीय चाचणी केली जाते. परंतु आर्यनची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. यावरून आर्यनला टार्गेट केले जात आहे असे दिसून येत आहे.
आर्यन खान याचा संबंध अरबाझ मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी संबंध जोडला जाऊ शकतो. पण अचित कुमार हा क्रूझवर उपस्थित नव्हता. त्याला घरातून अटक करण्यात आली आहे. आर्यन आणि अचित कुमार यांच्यात ऑनलाइन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. ही चॅटिंग १२ ते १४ महिन्यांपूर्वी झाली, असा दावा रोहतगी आणि अमित देसाई यांनी केला. मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात पंचनामा वाचून दाखवला. आर्यनवर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ अंतर्गत २० ब, २७ आणि कलम ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षेची तरतूद आहे. आर्यन खानच्या चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काहीही संबंध नाही. संबंधित चॅटिंग पार्टीच्या आधीची आहे, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.