राजेंद्र तोडकर, नाशिक
…
चार वर्षांपूर्वी फर्निचरचे काम झाले. तेव्हा प्लाऊडचे काही तुकडे उरले होते. मग एका कारागिराला जास्त पैसे देऊन पक्षांसाठी काही घरटी बनविली. एक घरटे खूप मोठे बनविले, हेतू हा की साळुंकी सारखा एखादा पक्षी त्यात घरटे करेल. मग मी टेरेसच्या एका कोपऱ्यात उंचावर ते घरटे बसविले. म्याझ्या अपेक्षेप्रमाणे साळूंक्यानी पाहणी करून तेथे संसार थाटायचा निर्णय घेतला. मी जोडीचे नामकरण केले. मिशा आणि मिता.मिशा हा नर जाडा होता व मिता सडपातळ होती.
दोघेही कुठून तरी कलकलाट करत यायचे. मिता आत जाऊन संसार सजवायची व मिशा बाहेर पहारा द्यायचा. मग जून महिन्यात मिताने तीन अंडी दिली. अंडी उबविण्याचे काम मिताच करत असे पण बाहेर नारळाच्या झाडावर बसून मिशा खडा पहारा देत असे. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर दोघांची धांदल उडाली. पहिले काही दिवस एकदम बारीक घास भरवत असत दोघे,
नंतर पिल्ले मोठी झाल्यावर अळ्या, कीटक भरविणे सुरू झाले. नंतर पिल्ले मोठी होऊन उडून गेली. घर रिकामे झाले असे करता करता तीन वर्षे होऊन गेली. तीन वर्षात तीन विण झाल्या. या वर्षी आम्ही टेरेस झाकण्याचा व एका कोपऱ्यात देवघर करण्याचा निर्णय घेतला. ते घरटे अडत असल्यामुळे माळ्यावर ठेऊन दिले. मार्च ,एप्रिल गेले आणि मिशा व मिता परत आले. त्यांना तो बदल जाणवला व त्यांचे घरटे तेथे नव्हते. त्यामुळे दोघे कावरे बावरे झाले. रोज सकाळी सहा वाजता येऊन ते कलकलाट करायला लागले. मग मी त्यांचे घरटे माळ्यावरून काढले व तेथे बसविले. आता दोघाना खुप आनंद झाला होता. मिताने लगेच घरट्याची डागडुजी केली, आतील जळमटे काढली, जुना कचरा काढला व घरटे स्वच्छ केले. मिशाने नवे गवत आणून दिले.
जून महिन्यात पुन्हा मिताने तीन अंडी दिली. एकवीस दिवसानंतर पिल्ले बाहेर आली. मिता रात्री घरट्यात रहात असे व मिशा नारळाच्या झाडावर रात्र काढे. पिल्ले हळूहळू मोठी झाली. ती घरट्या बाहेर डोकावयाला लागली. मी त्यांचे नामकरण केले. रिकू, मिकू आणि चिकू. रीकु हा द्वाड होता. तो पहिल्यांदा घास हिसकावून घेत असे. मीकु संधी साधू होता व चिकु लाजरा असल्यामुळे त्याला घरत्या बाहेर डोकावण्याची संधी मिळत नसे.
एके सकाळी मिशा,मिता नुसतेच घरट्या बाहेर बसून कलकलाट करत होते. पिल्ले भुकेली झाली होती, ती घरट्या बाहेर यायचा प्रयत्न करत होती. मग मीशाने मोठी अळी पिल्लांना लांबूनच दाखविली व तो नारळाच्या फांदीवर जाऊन बसला. मिता पिल्लांना बाहेर यायला सांगत होती व रीकू ने घरट्या बाहेर पंख पसरले व तो मिशा शेजारी बसला, बक्षीस म्हणून मग मिशाने त्याला भरवले. दोन दिवसांनी मिकु व चिकू ही उडून गेले. आता ते घरटे जास्तच सुन्न वाटते. मिता व मिशा ही परत आले नाही. ते आता त्यांच्या पिल्लांना जीवनाचे धडे देत असतील. ती पिल्ले नवा संसार थाटतील पण मिता आणि मिशा परत येतील काय ? कारण मला पण त्यांच्या सहवासाची सवय लागलीय, बघुया वाट.
…
लेखक – राजेंद्र तोडकर, नाशिक , मो. ९९२२१६०३०८