विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा अचानक का दिला?
विराट कोहलीने कसोटी क्रिकेट कर्णधार पदाचा राजीनामा दिला ही बातमी हादरा देणारी आहे असे काहींना वाटते. सहाजिकच आहे, आपल्याकडे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. विराटचे चाहतेही कमी नाहीत. त्यामुळे चर्चा तर होणारच. कर्णधार म्हणून विराटची कामगिरी किती ग्रेट होती हे सांगण्यासाठी इतकी आकडेवारी पुरेशी आहे की, सर्वश्रेष्ठ यशस्वी कर्णधारांच्या यादीत त्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
सप्टेंबर २०२१ मध्ये टी२० फॉर्मेट च्या कर्णधार पदाचा राजीनामा, दरम्यानच्या काळात आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा, २०२१ अखेरीस वनडे सामन्यात बीसीसीआय कडून नाट्यमयरित्या काढून घेण्यात आलेले विराटचे कर्णधारपद आणि आता नव्या वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात कसोटी कर्णधार पदाचा विराटकडून राजीनामा, या सगळ्या घटना काय सांगतात? यातून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींनी काय अर्थ घ्यायचा?…. एकच आणि तो म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये सगळं काही आलबेल नाही.
फार लांब जाऊ नका. टी२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडताना विराट कोहली म्हणाला होता की, मला वन-डे आणि कसोटी क्रिकेट यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कुठेतरी भार कमी करणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच टी२० क्रिकेटच्या कर्णधारपदाचा मी राजीनामा देतोय. म्हणजेच, थोडक्यात काय तर कर्णधार पदाचा एक लॉंग टर्म प्लॅन विराटच्या डोक्यात पाच सहा महिन्यांपूर्वी नक्कीच होता. पण आत्ता नक्की असं काय झालं की त्याने स्वतःच्या हाताने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाला राजीनाम्याचे लेबल लावलं?
आणखी एक गोष्ट. टी२० कर्णधार पदाचा राजीनामा देताना विराट म्हणाला होता की मी टीम मॅनेजमेंट सोबत बोललोय, रवीभाई सोबत बोललोय, रोहित शर्मा सोबत चर्चा केली आहे आणि या सगळ्यांशी चर्चा करूनच मी टी२० कर्णधार पदाचा राजीनामा देतो आहे. डिसेंबर २०२१ उजाडे पावेतो हे चित्र पूर्णपणे बदलून गेलं. वनडेच्या कर्णधार पदावरून आम्ही विराट कोहलीला काढत आहोत असं सुद्धा न सांगता बीसीसीआयच्या प्रतिनिधीने निर्णय जाहीर करताना असं सांगितलं होतं की, वन डे सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी ही रोहित शर्मावर सोपविण्यात येते आहे. शब्दांचे हे फटकारे चौकार षटकारांपेक्षा जास्त बोलके होते आणि बोचरे सुध्दा. त्या शब्दांच्या फटक्यातून झालेल्या वेदनांचा परिपाक म्हणूनच की काय, आता विराट कोहलीने त्याचा राजीनामा Tweeter च्या माध्यमातून जाहीर केलाय. असे करण्यापुर्वी तो बीसीसीआय सोबत बोलला की नाही, माहित नाही.
संघातल्या सहकार्यांना विश्वासात घेतलं की नाही, निदान अजून तरी माहीत नाही. निदान संघ प्रशिक्षकासोबत तरी याबाबत काही चर्चा झाली की नाही, माहीत नाही. ‘थांबण्याची योग्य वेळ आहे म्हणून थांबला का?’ तर तसेही वाटत नाही. कारण अजून तरी विराट कोहली समोर फार मोठी कारकीर्द उभी आहे. त्यामुळे इतक्या लवकर त्याच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध सुरू होईल असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही. मग दक्षिण आफ्रिके सोबत झालेला कसोटी मालिकेचा पराभव इतका जीवघेणा होता का, की त्याची किंमत मोजतांना कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा लागला? तर तसंही नाही.
परदेशी खेळपट्यांवर असले कितीतरी हादरे भारतीय क्रिकेटने सहन केलेले आहेत. मग या राजीनामा नाट्यामागे कुठेतरी विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वादाचा वास येतोय का ?…तर कदाचित हो, हीच शक्यता अजून तरी कोणी नाकारलेली नाही आणि ती नाकारण्या सारखी चिन्हे देखील नाहीत. वन-डे कर्णधार पदावरून पाय उतार केल्यानंतर विराट म्हणाला होता की त्याला एक काॕल बीसीसीआय तर्फे आला होता आणि तो काॕल संपता संपता त्याला सांगण्यात आले की वन-डे कर्णधार पदाची जबाबदारी ही रोहितला दिली जाते आहे. ते कोडं उलगडायला वेळ लागला नव्हता, पण त्यानंतर या प्रकरणाची फारशी चर्चा रंगलीच नाही. विराट – सौरभ वादाला गृहीत धरुन हा विषय संपवला गेला.
पण मग आता विराटला राजीनामा देण्यास भाग पाडलं की त्याने स्वतःहून राजीनामा दिला याची खातरजमा होणेही तितकेच आवश्यक आहे. या मागचा खुलासा फक्त विराट कोहलीच करू शकतो. याची खातरजमा तो लगेच करेल अशी काही शक्यता वाटत नाही. कदाचित काही वेळ घेईल किंवा भविष्यात कधीतरी येणाऱ्या आत्मचरिञासाठी हे गुपित तो राखूनही ठेवेल. पण एक नक्की, भारतीय क्रिकेटमध्ये जे काही चाललंय ते फार काही आलबेल चाललेले नाही. खासकरून रवी शास्ञीच्या प्रशिक्षक पदाचा कालावधी संपल्यानंतर जी काही उलथापालथ होते आहे ती भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाची नांदी आहे असे म्हणायला हरकत नाही.
क्रिकेटच्या निस्सिम चाहत्यांच्या हातात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कर्णधाराच्या जोखडातून मुक्त झालेला विराट कोहली नावाचा फलंदाज आता आणखी तेजाने तळपताना आपल्याला बघायला मिळेल का? याकडे सकारात्मक होवून बघणं आणि दुसरं म्हणजे या निमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा पर्वाची जी काही सुरुवात होते आहे, ती सुरुवात भारतीय क्रिकेटला यशाच्या मोठ्या शिखरावर नेऊन ठेवेल याबाबत आशावादी राहणं.
भारतीय क्रिकेटचा चाहता या नात्याने चाहत्यांच्या हातात इतकेच मर्यादित अधिकार आहेत आणि ते म्हणजे खेळ चांगला झाला, सामना जिंकला तर खेळाडूंचा, संघाचा उदोउदो करणे आणि पराभव झाला की इच्छा असेल त्या पध्दतीने संघाला शिव्या घालणे. कर्णधार कोण असावा? कोणी कधी राजीनामा द्यावा ? कुणी राजकारण करावं? हे ठरविण्यासाठीची सूत्रे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हवाली अजून तरी करण्यात आलेली नाहीत.