सरकारची आर्थिक मदत नको,
पर्यटन व्यवसायास गांर्भिर्याने घ्या
दोन दिवसांपूर्वीच भारतात पर्यटन दिन साजरा करण्यात आला. भारतासारखा वैविध्य असलेला देश अतिशय पर्यटन समृद्ध आहे. मात्र, या व्यवसायाकडे आजवर गांभिर्याने पाहण्यात आलेले नाही. हेच दुर्देव आहे.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
गेली २ वर्ष कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले. शासन या इंडस्ट्रीला हलक्याने घेत आहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. वास्तविक आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक गड-किल्ले व राजवाडे अशा एक ना अनेक पर्यटनपूरक बाबी सहज उपलब्ध आहे. त्याचा वापर देशाच्या सक्षमतेने देशाच्या अर्थकारणासाठी केला जात नाही. पर्यटन व्यवसाय या देशातील पहिल्या पाच इंडस्ट्रीतील एक महत्वपूर्ण आहे.
आपल्या जवळच्या सिंगापूर, थायलंड, दुबई, भुतान आदी देशांचे अनुकरण करायला हवे. त्याद्वारे देशभरातील या सर्व घटकांचा प्रभावी व नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवे. त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा यथायोग्य वापर तर होईलच शिवाय अनेक नवनवीन रोजगारही उपलब्ध होतील. आपल्या देशात कुठल्याही तरुण-तरुणीला आपण या व्यवसायात जावे असे वाटत नाही. कारण पर्यटन व्यवसायासाठी तसे पूरक वातावरणच तयार केले जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक आपल्याकडे येऊ शकतात. त्या माध्यमातून परकीय चलन मिळू शकते पण हा विषयच कुणीही उच्चपदस्थ गांभिर्याने घेत नाही.
मार्च २०२० नंतर या व्यवसायातील जुन्या व जम बसलेल्या मंडळींनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला. अशावेळी कुठलीही सरकारी मदत मिळाली नाही. पर्यटन व्यावसायिकांना अशी मोफतची काही अपेक्षाही नसते. पण सरकारने त्वरीत लक्ष घालून प्रवासातील जाचक नियम न लादता देशांतर्गत प्रवास सुटसुटीत कसा होईल, टॅक्स विवरणपत्र दाखल करणे, वाहनांचे विमा व सरकारी कर, आंतरराज्य कर, वाहन कर्ज, हप्ते या व अशा अनेक बाबींवर सहकार्य करुन पर्यटन व्यवसायास आधार देणे गरजेचे आहे.
प्रवासाच्या अनेक अटी-शर्थी असतांनाही घरात कंटाळलेल्या पर्यटकांनी लाॅकडाऊनमधून सुट्टी होताच जोरदार पर्यटन केले. अशावेळी त्यांना निर्भयतेने फिरता यावे यासाठी उपाययोजना करण्यापेक्षा RTPCR व राज्यांतर्गत प्रवासाचे नियमांच्या दहशतीत प्रवाशी फिरत होते. दुसर्या लाटेच्या दणक्यानंतर पर्यटनाची गाडी व्यवस्थित रुळावर आली होती. पण या बहुचर्चित तिसर्या लाटेने पुनश्च पहिले पाढे पंच्चावन्न अशी गत करुन ठेवली आहे. पर्यटनाबाबत याचे एकच उदाहरण द्यायचे झाले तर अंदमानचे बघा.
४५० बेटांवर विखुरलेल्या संपुर्ण अंदमान-निकोबारमध्ये फक्त ३९२ कोरोना बाधित होते. असे असतांना तेथील प्रशासनाने कुठलाही विचार न करता अचानक स्थानिक स्थळ दर्शन बंद केले. त्याचवेळी गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे रोज २५ ते ३० हजार पर्यटक भेट देत होते. अंदमान येथे असलेले पर्यटक, सर्व बुकींग करुन अंदमानला जाण्यासाठी तयार असलेले पर्यटक व स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा जबर फटका बसला. पण हे असे अनाकलनीय निर्णय घेणार्यांना विचारतो कोण? अशा परिस्थितीत पर्यटन व्यवसाय कसा तरणार? तरी कृपया शासनाने व नेते मंडळींनी या व्यवसायावर सखोल अभ्यास करुन पर्यटनाचा देशाच्या विकासातील टक्का वाढवण्यासाठी गांर्भिर्याने प्रयत्न करावे.