डिजिटल शिक्षक
कोरोनापूर्व काळातील शिक्षणपद्धती आणि त्यानंतरची शिक्षणपद्धती यात प्रत्यक्ष दिसत नसली तरी बरीच तफावत जाणवते. प्रामुख्याने जे लोक शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्या हे लक्षात येत असेल. या सगळ्यात, महत्वाचा फरक म्हणजे, कोरोनापूर्व काळात शिक्षकांची भूमिका ही फक्त शालेय किंवा महाविद्यालयाच्या वेळेपुरती, म्हणजे साधारण दहा ते पाच, एवढीच मर्यादित होती. परंतु कोरोना काळात हीच भूमिका २४ तासांवर गेली आणि त्यानंतर ती तशीच चालू राहिली.
कोरोनाआधी डिजिटल प्लॅटफॉर्म्स, जसे की व्हाट्सअँप, टेलिग्राम, गूगल, इत्यादी, केवळ संदेश पोहचवण्यापूरते मर्यादित होते, तेच कोरोना आणि त्यानंतर शिकवण्याची साधने होऊन गेली. त्यात आणखीन बऱ्याच साधनांची भर सुद्धा पडली. यामुळे खरंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आणि शिक्षक आता विद्यार्थ्यांसाठी २४ तास उपलब्ध राहू लागले. त्यामुळेच केवळ ‘शिक्षक’ न म्हणता आता ‘डिजिटल शिक्षक’ म्हणणेच योग्य ठरेल.
कोरोनापूर्व काळात शिकवण्याचा मुद्धा किंवा पाठ वर्गात शिकवून शिक्षक मोकळे होत असत. परंतु कोरोना काळात गणित, विज्ञान आणि असे विषय जिथे प्रात्यक्षिकं असतात ते शिकवणे कठीण होते. त्यामुळे शिक्षक प्रात्यक्षिकाचा एखादा व्हिडिओ तयार करीत आणि विद्यार्थ्यांना पाठवीत. जेणेकरून विद्यार्थ्यांना तो बघता येई व शिक्षकाला त्यावर प्रश्न विचारता येई. परंतु असे व्हिडिओ बनवणेसुद्धा सगळ्या शिक्षकांना सोपे नव्हते. सोपा मार्ग म्हणून, युट्युबवर त्या विषयाशी निगडित उत्तम व्हिडिओ शोधून मुलांना पाठविणे आणि शिकवण्याच्या तासामध्ये त्या व्हिडिओवरतीच चर्चा करणे हे सोईचे झाले.
बऱ्याच शिक्षकांनी हे केले आणि विद्यार्थ्यंना ते आवडले. कोरोनानंतर आताही बऱ्याच शाळा व महाविद्यालयांमध्ये अश्याच पद्धतीने शिकवले जाते. यालाच ‘फ्लिपड क्लासरूम’ म्हणतात. बरेच शिक्षकतज्ज्ञ आणि शिक्षणअभ्यासक मागील १०-१२ वर्षांपासून अश्याच पद्धतीने शिकवण्याचा आग्रह धरीत होते. परंतु ते तसे होत नव्हते. पण कोरोनाने ते घडवून आणले आणि आता सगळ्यांना ते सवयीचे झाले. त्यामुळे शिक्षकांची भूमिका बदलली आहे. ती आता शिकवण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारी झाली आहे. शिक्षक आता फेसिलिटेटर झाला आहे.
कोरोना पूर्व काळात विद्यार्थी सुद्धा बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सबद्दल अनभिज्ञ होते. परंतु कोरोनाने त्यांना बरेच शिकवले आणि शिकण्यासाठी काय योग्य किंवा अयोग्य, काय सोपे किंवा कठीण, काय आवश्यक किंवा अनावश्यक, काय उपयुक्त किंवा काय नाही हे शिकवले. त्यामुळे आपल्या शिक्षकाच्या तासापेक्षा अमुक-अमुक ऑनलाईन व्हिडिओ जास्त छान आहे हे लक्षात येउ लागले. या अश्या परिस्थितीत, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या शिकवण्याच्या पद्धतीवर काम करणे आणि त्यामध्ये नावीन्य आणणे हे शिक्षकांना समजले व बऱ्याच शिक्षकांनी ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सतत शिकत राहण्याची भावना शिक्षकांमध्ये रुजली. यालाच ‘लाईफ लॉन्ग लर्निंग’ म्हणतात.
आणि हे २१ व्या शतकातील एक मुख्य कौशल्य आहे जे विद्यार्थ्याना शिकवणे खूप आवश्यक मानले जाते. आनंदाची गोष्ट म्हणजे बहुतांशी शिक्षकमंडळी हे आचरणात आणित आहेत आणि स्वतःबरोबर विद्यार्थ्यांना २१ व्या शतकासाठी तयार करीत आहेत. गरज आहे केवळ सातत्याची आणि सतत नव्याचा ध्यास घेण्याची. आणि हे जर का सध्या झाले तरच खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होईल.
Article on Teachers Transformation Digital