‘यशवंत’चे पाईक – शंकरराव गोटीराम खळगे (सर)
कै. महाबळ गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंनीच पुढे यशवंत व्यायाम शाळेत क्रीडा प्रशिक्षकांचे काम सुरू केले. तेही कोणताही मोबदला न घेता. या क्रीडा शिक्षकांपैकीच एक श्री. शंकरराव गोटीराम खळगे सर या निस्वार्थी व सेवाभावी व्यक्तिमत्वाचा वयाच्या ९१ व्या वर्षा निमित्त परिचय करुन देत आहेत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अविनाश खैरनार…..
नाशिक येथेच जन्मलेले श्री. शंकरराव गोटीराम खळगे यांचा जन्म १९३१ मध्ये झाला. लहानपणी यशवंत व्यायाम शाळेत कै. महाबळ गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यायामाचे धडे घेतले. दंड, बठका, सुर्यनमस्कार व योगासने इ. व्यायाम प्रकाराने त्यांची शरीरयष्टी पिळदार होती. कै. भाऊसाहेब हिरे हे यशवंत व्यायाम शाळेत कार्यक्रमानिमित्त आले असता कै. महाबळ गुरूजींनी खळगे सरांच्या शरीरयष्टीची ओळख भाऊसाहेब हिरेंना करून दिली. त्यावेळी भाऊसाहेब हिरेंनी त्यांच्या शरीरास हाताने स्पर्श करून चाचपणी केली व त्यांच्या शरीर यष्टीचे कौतुक केले होते. दंड मारण्याचे सर्व प्रकार ते अतिशय उत्कृष्ठपणे करत असे.
खळगे सर तेव्हाचे सरस्वती विद्यालयात अर्थाजनासाठी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजु झाले. पण व्यायामाची आवड असल्याने त्यांनी कै. महाबळ गुरूजीं नंतर यशवंत व्यायाम शाळेत रोज खेळाडूंना दंड, बैठका व योगासनाचे धडे देण्यास सुरूवात केली. तत्कालीन नाशिक नगर पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या एका कार्यक्रमात तेव्हाचे शिक्षणाधिकारी श्री. उपासणी हे व्यायाम प्रेमी होते. त्यांनी खळगे सरांची शरीयष्ठी बघुन व खेळाडूंना घडविण्याचे कौशल्य बघुन भारावुन गेले होते. त्यांनी खळगे सरांची दंडाचे विविध प्रकार करण्यास सांगुन त्यांची चाचणी घेतली व आचंबित होऊन त्यांना नगर पालिकेच्या शाळेतील खेळाडूंना घडविण्यासाठी नगर पालिकेच्या गांधीनगर येथील हिंदी शाळेत हिंदी शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्याशिवाय नगर पालिकेच्या १५० शाळांच्या शिक्षकांना व्यायाम करून घेण्याचे धडे देण्याची जबाबदारी दिली.
खळगे सर जरी हिंदी शिक्षक असले तरी व्यायामाच्या आवडीमुळे त्यांनी यशवंत व्यायाम शाळेत खेळाडू घडविण्याचे कार्य सुरूच ठेवले होते. त्यावेळी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने सर्व खेळांचे नियंत्रण होत होते. त्यामुळे विविध ठिकाणी स्पर्धा भरविणे स्पर्धेसाठी पंचांची नियुक्ती करणे, खेळाडूंना तसेच क्रीडा शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देणे इ. कामे ही या मंडळा मार्फतच होत असे. नाशिकरोड येथे १५० नगरपालिका शाळेतील शिक्षकांना विद्याथ्र्यांकडून व्यायाम प्रकार कसे करून घ्यायचे याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने खळगे सरांवर सोपविली होती. दोन महिन्याचे हे प्रशिक्षण शिबीर खळगे सरांनी सकाळ व संध्याकाळ सत्रात कठोर मेहनत घेऊन यशस्वीरित्या पार पाडले. त्यांची खेळाप्रती, व्यायामाप्रती असलेली आत्मीयचा व कौशल्य यामुळे पुढे नाशिक, ठाणे व डांग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना व्यायाम प्रकार शिकवण्यासाठी qदडोरी तालुक्यातील वणी येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात प्रशिक्षण देण्यासाठी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २०० प्राथमिक शिक्षकांना मुलांकडून करून घ्यावयाच्या व्यायाम प्रकाराची माहिती झाली. तसेच या शिक्षकांमार्फत मुलांनादेखील व्यायामाची आवड निर्माण झाली. खळगे सर व्यायाम प्रकारात तरबेज होतेच परंतु विविध खेळांमध्येही ते पारंगत होते.
अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लंगडी आणि मारचेंडू (आताची लगोरी) या खेळांच्या पंच परिक्षेत ते उत्तीर्ण होऊन या खेळांचे अधिकृत पंच म्हणून देखील प्रत्येक स्पर्धेत सहभागी होत. १९८९ मध्ये नाशिकरोड येथील qहदी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून खळगे सर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मात्र त्यांनी यशवंत व्यायाम शाळेसाठी पूर्ण वाहून घेतले असे म्हटले तर वावगे होणार नाही. सन १९४८ पासून सर यशवंत व्यायाम शाळेत खेळाडूंना दंड, बैठका व योगासने शिकवित होतेच, त्याबरोबर यशवंत व्यायाम शाळेचे लेझिम पथक तयार करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. त्यावेळी गणेशोत्सव मिरवणुकीत यशवंत व्यायाम शाळेचे लेझिम पथक, डबलबार, मल्लखांब यांची प्रात्यक्षिके नाशिक करांचे आकर्षण होते. मुलांमध्ये खेळाची, व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी यशवंत व्यायाम शाळेत वासंतिक शिबीर आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता. पुढे ते यशवंत व्यायाम शाळेचा आर्थिक विभाग सांभाळत असे. त्यासाठी रोज सकाळी ५.३० ते १०.०० व सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत यशवंतच्या विद्याथ्र्यांची फी गोळा करणे, देणगीदारांकडून देणगी स्विकारणे, यशवंत व्यायाम शाळेचे लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी इ. देयके भरणे, जमा रक्कम त्याच दिवशी बँकेत जमा करण्याचा त्यांचा नेहमीच कटाक्ष होता.
यशवंत व्यायाम शाळा ही आपलीच संस्था आहे. ही भावना त्यांनी कायम ठेवली. संस्थेच्या कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा व काटकसर ही वृत्ती त्यांनी शेवटपर्यंत जोपासली. त्यांच्या म्हणण्यानुसार देणगीदार, खेळाडूंची फी यातून जमा होणाèया निधीतून संस्थेची देखभाल व खेळाडूंना विविध सुविधा देण्यासाठी काटकसर व बचत केल्यास त्याचा संस्थेस फायदाच होतो. खळगे सरांनी सेवानिवृत्तीनंतर यशवंत व्यायाम शाळेस पूर्ण वाहून घेतले. दसरा, दिवाळी या मोठ्या सणांच्या दिवशी देखील यशवंत व्यायाम शाळेत हजर राहून आपले सण त्याठिकाणीच साजरे करत. अशा या निस्पृह व्यक्तिमत्वाचा त्यांच्यातील असलेल्या कौशल्यामुळे महाराष्ट्र शासन, सार्वजनिक वाचनालय, नाशिक महानगर पालिका, लायन्स क्लब यांनी आदर्श शिक्षक म्हणून सन्मान देखील केलेला आहे. नेहमीच पडद्याआड प्रचंड मेहनत घेणाèया आदर्श अशा क्रीडा शिक्षकांची वयाच्या ९१ व्या वर्षी देखील स्मरणशक्ती दांडगी आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य निरोगी व सुदृढ रहावे हिच महाबली हनुमानाच्या चरणी प्रार्थना!