जगातील पहिल्या आदर्श महिला राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर
जागतिक स्तरावर आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. आज कला,साहित्य, क्रीडा, राजकारण, विज्ञान, संशोधन, सैन्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी प्रवेश करून कीर्ती प्राप्त केलेली आहे. परंतु हे घडत असताना आपण विसरतो आहोत की महिलांच्या धैर्याची, शौर्याची व कीर्तीची सुरुवात कधी आणि कुणापासून झाली.
जवळपास 17 व्या शतकामध्ये जेव्हा महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नसायची त्याकाळी नगर जिल्ह्यातील चौंडी या गावातील एक बालिका आपल्या दयाळू, दानशूर वृत्तीमुळे व धाडसी स्वभावामुळे सरदार मल्हारराव होळकर यांच्या दृष्टीस पडली आणि त्यांच्या चाणाक्ष नजरेने या बालिकेचे दैवी गुण ओळखून तिला आपली सून करून घेण्याचा निश्चय केला. ही बालिका म्हणजेच महाराष्ट्राची कन्या राजमाता अहिल्याबाई होळकर होय.
अहिल्याबाईंचे वडील पाटील होते. त्यांनी अहिल्याबाईंचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मल्हाररावांनी अहिल्याबाईंचा त्यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी विवाह लावून दिला आणि अहिल्याबाई, होळकर घराण्यात गेल्या. विवाहानंतर त्यांना मालेराव नावाचा सुपुत्र व मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई सुरुवातीपासूनच मल्हाररावांना राज्यकारभारात मदत करीत असत. मल्हारराव विविध मोहिमांवर गेलेले असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी देखील अहिल्याबाई लीलया सांभाळत असत. तसेच पती खंडेराव यांना देखील राज्य कारभारामध्ये त्या मदत करीत असत. खंडेराव यांच्यातील युद्धकौशल्य वाढीसाठी त्यांना अहिल्याबाई वेळोवेळी प्रोत्साहित करीत असत.
अहिल्याबाईवर जीवनातील सर्वात मोठे पहिले संकट आले ते 1754 साली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचा कुंभेरी येथील युद्धात मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्याबाईनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना प्रजेच्या सेवेसाठी त्यापासून परावृत्त केल्याने त्या सती गेल्या नाहीत. लवकरच म्हणजे 1766 मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. त्यामुळे मावळ प्रांताची संपूर्ण जबाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली मुलगा मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली आणि राज्यकारभार सुरू केला. परंतु वर्षभरातच 1767 साली पुत्र मालेरावांचा देखील मृत्यू झाला.
वडिलांसमान असलेले सासरे, पती नंतर मुलगा असे एकामागून एक घरातील सर्व कर्ते पुरूष गेल्यानंतर व दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील अहिल्याबाईंनी स्वतःला सावरत 1767 पासून मावळ प्रांताची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि एक लोककल्याणकारी राज्य सुरू झाले. अहिल्याबाई ह्या भगवान शिवशंकराच्या परमभक्त होत्या. तसेच त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्याचप्रमाणे युद्धशास्त्रात निपून होत्या, त्यांची रणनीति देखील निष्णात होती, त्या पराक्रमी देखील होत्या. तुकोजीराव होळकर यांना सेनापती करून प्रसंगी स्वतः रणांगणावर उतरून अनेक लढाया त्यांनी यशस्वीपणे लढल्या हत्तीवर बसून शत्रूवर बाणांचा वर्षाव करून त्या शत्रूस जेरीस आणत असत. त्यामुळे त्याकाळी सर्वत्र त्यांच्या शौर्याची चर्चा होती. याचबरोबर त्यांनी राज्याच्या विकासाकडे देखील तेवढेच लक्ष दिले. उद्योगधंदे, व्यवसाय, करपद्धती यांच्यातील सुधारणांबरोबर कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी प्रांताचे तालुके आणि जिल्ह्यांमध्ये विभाजन करून अनेक ठिकाणी न्यायालयाची स्थापना केली.
अनेक तीर्थ स्थळांची निर्मिती केली, हिंदूंची पवित्र स्थाने अयोध्या, जगन्नाथपुरी, काशी, गया, मथुरा, बद्रीनाथ, त्रंबकेश्वर अशा भारतभरातील अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारणे, विहिरी, विश्रामगृहे, रस्त्यांची निर्मिती, बारव, भारतातील विविध ठिकाणी नद्यांवर घाट बांधणे, भुकेल्यांसाठी अन्नछत्र, तहानलेल्यांसाठी पाणपोया उभारणे अशी अनेक लोककल्याणकारी कार्य त्यांनी केले. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची आदर्श राज्यकर्ता म्हणून सर्वदूर कीर्ती पसरत गेली.
आज महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहेत. अशाच पद्धतीने 300 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी महिलांसाठी भरीव असे कार्य केलेले दिसून येते. त्याकाळी विधवा महिलांना अपत्यं असली तरी कायद्यानुसार त्यांची संपत्ती सरकारी खजिन्यात जमा व्हायची त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीही साधन नसायचे. अशावेळी अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करून पतीच्या संपत्तीचा हक्क विधवा महिलांना मिळवून दिला. त्याचप्रमाणे महिलांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी विविध उपाययोजना केल्या, महिलांविषयी केलेल्या कार्यामुळे पुढील काळात महिलांसाठी अहिल्याबाई ह्या सतत प्रेरणास्रोत राहिल्या. अशा या लोककल्याणकारी राजमाता अहिल्याबाईंचा 1795 मध्ये मृत्यू झाला. परंतु आजही त्या त्यांच्या कार्यामुळे जगात एक लोक कल्याणकारी आदर्श महिला राज्यकर्त्या म्हणून स्मरणात आहेत.