इंडिया दर्पण विशेष लेखमाला
आपलं पर्यावरण
थॅंक्यू ओझोन लेअर!
पॄथ्वीभोवती अस्तित्वात असलेले ओझोनचे आवरण बहुउपयोगी मानले गेले आहे. सूर्याची अल्ट्रा व्हायोलेट किरणे शोषून घेत त्यापासून, विशेषतः धोकादायक अशा युव्हीबी किरणांपासून धरतीचे, त्यावरील जीव-जंतूंचे आणि अर्थातच मानवाचे रक्षण करणे हा त्यामागील प्रमुख हेतू. युव्हीबी प्रकारची किरणे कर्करोगाला आमंत्रण देणारी असतात. समुद्रातील जीव, जमिनीवरील झाडांसाठीही ती घातकच असतात. ओझोनचे हे आवरण नसते तर भूतलावरील जीवन इतके सहज-सोपे राहिले नसते. इतर विविध प्रकारच्या रोगांव्यतिरिक्त त्वचेच्या आजाराचे भीषण चित्र सर्वदूर निर्माण झाले असते. लोक इम्युनिटी पाॅवरसाठी झगडताना दिसले असते. म्हणूनच आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत, की त्याने ओझोनचे आवरण तयार करून एकूणच मानवी अस्तित्व सुकर केले.
मानवाइतका कॄतघ्न कोण असेल जगात? तो स्वरक्षणासाठी असलेल्या या ओझोनच्या आवरणावरच घाला घालायला निघाला आहे. त्यामुळे ओझोन आवरणाची जाडी कमी होणे, काही ठिकाणी त्यास छिद्र पडणे अशा गोष्टी घडताना दिसताहेत. विविध उद्योगांमधून उत्सर्जित होणारे रासायनिक घटक त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. विशेषतः ब्रोमीन, क्लोरीनचा समावेश असलेले रासायनिक घटक तर अधिक घातक ठरताहेत. घराघरात वापरल्या जाणाऱ्या एअर कंडीशनर्समधून उत्सर्जित होणारा वायू, रेफ्रिजिरेटर्स मधून बाहेर पडणारा वायू, साॅल्व्हंट्स वा एरोसोल स्प्रे मधून बाहेर पडणारा वायू, ज्याला क्लोरोफ्ल्युरोकार्बन असे म्हणतात, तो ओझोनच्या आवरणावर सतत आघात करतो आहे. राॅकेट लाॅंचींगच्या प्रक्रियेत उत्सर्जित होणारा वायू तर क्लोरोफ्ल्युरोकार्बन पेक्षाही घातक असल्याचे सांगितले जाते.
तज्ज्ञांच्या मते राॅकेट लाॅंचींगच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवले नाही तर २०५० पर्यंत ओझोनच्या आवरणाला अधिक धोका निर्माण होईल. नायट्रोजनयुक्त घटक, सूर्यावरील डाग, ज्वालामुखीमुळे बाहेर पडणारा लाव्हा, परिसरात वाढणारे तापमान, वादळे, हिलाॅन, कार्बन टेट्रॅक्लोराईड, हायड्रोफ्ल्युरोक्लोरो कार्बन आदींमुळे देखील ओझोनच्या आवरणावर नकारात्मक परिणाम होताहेत. यातील सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे, ओझोन आवरणाची जाडी दिवसेंदिवस कमी होते आहे.
काही ठिकाणी त्यास छिद्र पडल्याने विषारी अल्ट्रा व्हायोलेट किरणे जमिनीपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. घराघरात वापरली जाणारी, कारखान्यात उपयोगात आणली जाणारी उपकरणे, इतकेच कशाला, आग विझविण्यासाठी म्हणून ज्या उपकरणांचा उपयोग केला जातो, त्यातून सुद्धा हिलाॅन, कार्बन टेट्रॅक्लोराईड, हायड्रोफ्ल्युरोक्लोरो कार्बनचे उत्सर्जन होते, जे ओझोन आवरणासाठी घातक आहे.
ओझोनच्या आवरणावर सतत होणाऱ्या रासायनिक घटकांच्या माऱ्यामुळे जे नकारात्मक परिणाम होताहेत, त्याचे थेट दुष्परिणाम पॄथ्वीवरील जवळपास सर्वच घटकांना भोगावे लागताहेत. मानवी समुहाला सूर्य किरणांची दाहकता सहन करावी लागण्यापासून तर अकाली वृद्धत्वापर्यंतचा सामना करावा लागतोय्. वर उल्लेखिलेल्या कर्करोग, त्वचारोग, डोळ्यांचे विकार तर सोबतीला आहेतच.
मानवासोबतच प्राणीमात्रांनाही थेट अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या संपर्कात येण्याचे परिणाम म्हणून त्वचेचे विकार आणि डोळ्यांचा कर्करोग होण्याची भीती असते. झाडांची वाढ खुंटणे, फुलं न उमलणे, त्यांची फोटोसिंथेसीसची प्रक्रिया प्रभावीत होणे, जंगलावरील प्रभाव, या साऱ्या गोष्टी ओझोन आवरणाची पर्यावरण रक्षणासाठीची आवश्यकता अधोरेखित करतात. ओझोनच्या आवरणाला बसणाऱ्या धक्क्याने दुष्परिणाम केवळ जमिनीवरील जीवावरच होतो असे नाही, तर समुद्रातील वनस्पती, प्राणी यांचे अस्तित्व देखील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे नकारात्मक रीतीने प्रभावीत होत आहे. समुद्रातील जीवांची अन्न साखळी विस्कळीत होण्याची शक्यता हा त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम मानला जातो.
म्हणूनच, ओझोन आवरणाचे रक्षण हा दुर्लक्षिण्याजोगा मुद्दा नाही, हे सर्वप्रथम ध्यानात घेणे गरजेचे आहे. जगभरातील विविध देशांनी, युनोने घेतलेल्या पुढाकाराने ओझोन आवरणाच्या रक्षणासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले जाताहेत. त्यातून एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आपण बरीच चांगली स्थिती गाठू शकू असा विश्वास शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ व्यक्त करताहेत. पण तरीही प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी अंमलात आणल्या तर त्या या प्रक्रियेत साह्यभूत ठरतील.
रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडीशनर्समध्ये सीएफसी वायूचा उपयोग टाळणे, फायर एक्स्टींगविशरमधे हिलेन वायूचा वापर टाळणे, शक्य असेल तितका वाहनांचा वापर कमी करणे, शक्यतो टाळणे हे उपाय असू शकतात. घरात स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध रासायनिक पदार्थांमधून उत्सर्जित होणारे क्लोरीन आणि ब्रोमीन सारखे वायू पर्यावरणासाठी नुकसानकारक आहेत. याला नैसर्गिक वस्तूंचा पर्याय शोधणे आवश्यक आहे. नायट्रस ऑक्साईडचा वापर टाळण्यासाठी तर सरकारने देखील पावले उचलण्याची, गरज भासल्यास त्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याची सुद्धा गरज आहे. तसे तर १९८७ मध्ये जागतिक पातळीवर झालेला ‘montreal protocol’ साठीचा करार बराच उपयुक्त आहे. ओझोन आवरणाला धोका ठरणाऱ्या पदार्थांची निर्मिती, वापर यावर नियंत्रण ठेवण्याची बाब तर त्या करारातच नमूद आहे. ओझोन आवरण अस्तित्वात आहे म्हणून पॄथ्वीवरील जीव सुरक्षित आहे, ही बाब लक्षात घेऊन त्याचे आभार मानणे आणि त्यांच्या रक्षणासाठी १९८७च्या जागतिक कराराची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलली जाण्याची आवश्यकता आहे.
Article on Ozone Layer Earth Protection by Pravin Mahajan