शेतीचे फिजिशियन – डॉ अनिल बोन्डे
भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांचा वैद्यकीय व्यवसाय आणि शेती-माती या दोन्ही भिन्न स्वरुपाच्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मनतेने असणारा सहभाग, त्यांचे सामाजिक भान, राजकीय वाटचाल अशा विविधांगांनी बोंडे यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांचे सुहृद रवींद्र अमृतकर (सचिव, महाकिसान वृद्धी ऍग्रो प्रोड्यूसर फेडरेशन) यांनी टाकलेला प्रकाशझोत….
डॉ. अनिल बोन्डे यांची ओळख आता राज्याचे माजी कृषी मंत्री यासोबतच संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणजेच खासदार अशीही झाली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या बोंडे यांची वृत्ती मुळातच अभ्यासू. त्यामुळे समाजकारण, राजकारण करताना कोणताही मुद्दा असो की प्रश्न असो बोंडे त्याला भिडतात ते मुळापासूनच. त्यामुळे संबंधित प्रश्न अत्यंत झपाट्याने मार्गी लावण्याची हातोटी त्यांना चांगलीच जमते. त्यांचा आणि माझा संबंध आला तो मुख्यत्वे शेती विषयाच्या माध्यमातून.
पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या विविध बैठकीतून केंद्र तसेच तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर डॉक्टर साहेबांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावांचे रुपांतर अगोदर ठरावात होते आणि त्यापाठोपाठ तो मुद्दा लगेचच धोरणात्मक स्वरुपात अंमलातही येतो हे मी अनेक वेळा अनुभवले आहे. जेमतेम 82 दिवस राज्याचे कृषी मंत्रीपद त्यांना लाभले पण त्या काळातही त्यांनी आपल्यातील कामाची उत्तम चुणूक दाखवून दिली. त्यानंतर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि आता भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून कायर्रत असताना त्यांनी सामान्य शेतकरी हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू राखत त्यादृष्टीने मजबूत पायाभरणी केली आहे. हे पाहता, शेतीविषयक जाण असलेल्या आणि शेतीशी निगडीत प्रश्न सोडविण्याची पुरेपूर क्षमता अंगी बाळगलेल्या नेत्याचा बोंडे यांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात उदय झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष असताना मी डॉ. बोंडे यांना नाशिक मधील कांदा प्रश्न आणि नाफेडच्या खरेदी कामकाजाबाबत अवगत केले होते. विषयाची व्याप्ती पाहता त्याला न्याय देण्यासाठी केवळ निवेदने, मागण्या तसेच कृषी मंत्री महोदयांच्या भेटी यामुळे फार काही साध्य होणार नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष जमिनीवर येऊन काम करावे लागेल आणि आपले काम इतरांपेक्षा वेगळे कसे आहे हे सिद्ध करून दाखवावे लागेल, असे मला बोंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावर दोन तीन दिवस विचार करून मी आपल्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर वेळोवेळी बोन्डे साहेबांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम मागणाऱ्यावरून काम देणारा झाला आहे.
माझ्या केवळ इच्छा शक्तीच्या आधारे डॉ. बोन्डे यांनी मला पाठबळ दिल्यामुळे आज मी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक संघांच्या महा किसान वृद्धी फेडरेशनला बाजारात नवी ओळख निर्माण झाली आहे. अंत्योदय हेच उद्दिष्ट्य ठेऊन शेतकरी उत्पादक कंपनी आणि सामान्य शेतकरी केंद्र शासनाच्या कृषी विषयक धोरणाचा लाभार्थी कसा होईल यासाठी आपण कार्यरत राहायचे असा मंत्र बोन्डे साहेबांनी आम्हाला दिला. त्याची फलश्रुती नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आणि अनेक सामान्य स्थितीतील कंपन्या अनुभवत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गेल्या वर्षी नाफेड कांदा खरेदीसाठी चांगले काम केलेल्या निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपण कमवलेल्या नफ्यातील काही हिस्सा प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे परत देण्याचा संपन्न झालेला सोहळा म्हणजे डॉ. बोन्डे यांच्या ‘शेतकऱ्याची समृद्धतेकडे वाटचाल’ या ध्येयाची पर्यायाने अंत्योदयाच्या दिशेने पाऊल टाकणारी अवघ्या एक वर्षातील कामाची पूर्तीच होती. हा एक दाखला ते आता राज्यसभेचे खासदार झाल्यामुळे भारतातील तमाम शेतकऱ्यांच्या हिताला ते कशी गती देतील याचा आदमास घेण्यास पुरेसा आहे. डॉ. बोन्डे यांना निवडणुकीच्या मतदानापूर्वी पत्रकारांनी आपल्या मनात काही धाकधुक आहे का, असे विचारले असता बोन्डे यांनी ‘धाक’ देवेंद्र फडणवीस यांचा आणि ‘धुक’ महाविकास आघाडीला असा हजरजबाबी षटकार ठोकत आपला विजयाचा विश्वास अधोरेखीत केला होता.
बोंडे हे पेशाने डॉक्टर असले तरी ते रमतात शेतीतच. त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाने सातत्याने कृषी विषयक कामांच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा त्या तेवढ्याच समथर्पणे पेलल्या आहेत. गुजरात भाजप किसान मोर्चाचे प्रभारी म्हणून अहमदाबाद मधील ‘कमलम’ कार्यालयात गुजरात भाजप किसान मोर्चा कार्यकर्त्यांशी केलेला प्राकृतिक शेती बाबत अभ्यासपूर्ण संवाद, त्यानंतर नवसारी कृषी विद्यापीठात प्राध्यापक -शास्त्रज्ञाशी झालेला संवाद बोंडे यांच्या अभ्यासूपणाचा प्रत्यय देणारा ठरला. एवढा की अनेकांना बोंडे हे खरोखर वैद्यकीय डॉक्टर आहेत की शेतीमधील पीच.डी. आहेत असा प्रश्न पडला.
गुजरात दौऱ्यात वडोदरा, नर्मदा जिल्ह्यात ग्रामीण भागात झालेल्या खेडुत मेळ्यात आयोजकांनी ‘महाराष्ट्रना माजी कृषीमंत्री डॉ. अनिलभाई तमारासी संपर्क करते’ अशी काहीतरी ओळख करून दिल्यानंतर डॉ बोन्डे आपल्या भाषणाची सुरुवात ‘केम छो’ अशा अस्सल गुजराती ढंगाने संवाद साधत करत असत आणि नंतर सुरुवातीची काही वाक्ये आवर्जून गुजराती मध्ये बोलून त्यांच्या शेतीची खुशाली जाणून घेत असत. मग पुढील संवाद हिंदी मध्ये साधत असत. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना स्पर्श करण्याची डॉ. बोन्डे यांची हातोटी राज्यसभेत आपला वेगळा ठसा निश्चितपणे उमटवेल.
आतापर्यंत अनेक रुग्णांच्या व्याधी आपल्या एम.डी. मेडिसिन या पदवीच्या ज्ञानामुळे दूर करणाऱ्या डॉ. बोन्डे यांनी भारतीय शेतीमधील विविधता, विविध भौगोलिक परिस्थिती मधील भिन्नता, हवामानावर विसंबून असलेल्या शेतीच्या अनेक पैलुंचे डिसेक्शन कुशलतेने केले आहे. आता खासदारकीच्या माध्यमातून त्यांना त्यापुढचा टप्पा गाठत शेती क्षेत्रातील पीक पाण्याचे आरोग्य संवर्धन करण्याचा अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे. मोदी सरकारने अनेक माध्यमातून त्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहेच. भारतीय शेती मधील समस्या दूर करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना आणि काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांना जडलेला मानसिक आजार कायमस्वरूपी दूर करण्याची हातोटी डॉ बोन्डे यांच्यामध्ये आहे आणि आपली राज्यसभेची कारकीर्द ते त्या दृष्टीने गाजवतील याबाबत आम्हा कार्यकर्त्याच्या मनात अजिबात शंका नाही.
डॉ. बोन्डे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्याकडे आपली तब्येत दाखविण्यासाठी मध्यरात्री पर्यंत रुग्ण आपला नंबर लागण्याची वाट पहात असत. त्यांच्या हाताला असणाऱ्या गुणाची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीत चांगलीच पसरली होती. पण, एवढी उत्तम चालणारी प्रॅक्टिस अचानक बंद करून सामान्य शेतकऱ्यांसमोरील शेतीप्रश्न सोडविण्याच्या हेतूने ते शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी सध्या आपले तन-मन-धन अर्पण करून कार्यरत झाले आहेत, हे विशेष. त्यांचा हा ध्यास आणि लोककल्याण तसेच कृषी क्रांतीसाठीचे झपाटलेपण त्यांना आता राष्ट्रीय राजकारणातही चमक दाखवायला उपयोगी पडेल यात शंका नाही. राज्यसभा सदस्य म्हणून आपल्या खासदारकीचा श्रीगणेशा करत राजकारणाच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील होत असलेल्या बोंडे साहेबांना या निमित्ताने सर्व चाहत्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा…