उद्या (शनिवार, दि ०९ एप्रिल) जरी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक होत आहे, तरीही सर्व पदाधिकारी आणि निवड समिती सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस आणि रस्सीखेच केव्हाच संपली आहे. शिवाय उद्या फक्त कार्यकारिणीच्या १० सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उभे असलेल्या ११ पैकी कोणते १० निवडून येणार हे जवळपास निश्चित असल्याने नीरस आणि Without excitement अशीच ही निवडणूक म्हणता येईल.
तरीही त्यानिमित्ताने २६७० सदस्य, ६२ रजिस्टर्ड क्लब प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र हे गंगापूर रोड येथील नंदनवन कार्यालयात करोना काळात दोन वर्षे न भेटू शकल्या मुळे एकत्र येतीलच आणि निवडणूककीचे वातावरण निर्माण करतील यात शंका नाही. बिनविरोध निवड याचा अर्थ विनोद शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी गेली १९ वर्षे केलेल्या पारदर्शी , उत्तम आणि निस्वार्थीपणे केलेल्या कामाला मिळालेली ही दाद आणि पावती आहे. विनोद शहाच्या कारकीर्दीत संघटना आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली , गुणवत्ता शोध तसेच गुणी खेळाडूना उत्तम संधी मिळवून देण्यात (सत्यजित बछाव, माया सोनावणे, ईश्वरी सावकार इ) आणि खेळाडूंना आधुनिक आणि उत्तम मैदानासह दर्जेदार सुविधा देण्यात कोठेही कमी पडली नाही. या शिवाय महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतही महत्त्वाच्या पदावर प्रतिनिधित्व करीत आली आहे.
गेल्या २० वर्षांत तीन वेळा नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेला राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा क्रिकेट संघटना म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. तिसरा पुरस्कार तर याच सालात मिळाला आहे. या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणजे एकूण सुमारे तीन हजार सदस्यांनी विनोद शहा आणि सहकार्यावर त्यांची बिनविरोध निवड करून विश्वास व्यक्त केला आहे. कारण ते त्या विश्वासाला पात्र आहेत, अशी त्यांना खात्री वाटते..
आता नूतन कार्यकारिणीला अधिक जोमाने काम करायला उत्तेजन मिळेल आणि नाशिकला राज्यातील महत्वाचे क्रिकेट केंद्र म्हणून विकास करण्यास मदत होईल. संघटनेत नव्या रक्ताला आणि झोकून काम करणाऱ्या इतरांनाही संधी मिळावी यासाठी गेल्या सहा वर्षांत प्रशांत राय, किरण जोशी, श्रीधर दाबक आणि संजय परिडा आदींनी स्वतः होऊन वाट करून दिली हाच आदर्श आणि त्याग इतरांनाही पुढील काही वर्षांत अनुसरावा लागेल. काम करायचे असेल तर पद हवेच असे नाही हे वरील चौघांनी दाखवून दिले आहे.