अमृत महोत्सवी… आन, बान आणि शान “तिरंगा”…!!
शेकडो भारतीयांनी “वंदे मातरम” म्हणून या देशासाठी बलिदान दिलं… हा देश एका मंत्रात गुंफला त्या “जय हिंद” चं प्रतिक म्हणजे भारतीय तिरंगा ध्वज आहे. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने या देशाच्या स्वाभिमानाचे प्रतिक म्हणून तिरंगा ध्वज स्वीकारला.. त्या घटनेला 22 जुलै 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ध्वज आणि त्याचा इतिहास यावर प्रकाश टाकणारा हा लेख…!!
ध्वजाचा प्राचीन इतिहास
ध्वज म्हणजे मानाचे, यशाचे, आदर्शाचे चिन्ह. अतिप्राचीन काळी संदेश वाहकाचे प्रतिक. प्राचीन मानवी समूहांनी किंवा टोळ्यांनी आपापल्या गटाची चिन्हे म्हणून पशु, पक्षी तसेच काल्पनिक किंवा दैवी वस्तू, देवता यांच्या चित्रांचा उपयोग म्हणून केलेला दिसतो. शत्रू पक्षाला किंवा मित्र पक्षाला ओळखायला त्यापेक्षा अधिक उत्तम साधन त्याकाळी काही नव्हते. महाभारत, युक्तिकल्पतरु, अपराजितपृच्छा इत्यादी प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथातील ध्वजवर्णनावरून ध्वज पताका हा कुलचिन्ह, आपल्या गौरवी परंपरेच प्रतिक म्हणून प्राणांतिक मोल ध्वजाला दिल्याची उदाहरण आहेत.
मराठ्यांचा अटके पार झेंडा
प्राचीन काळात ध्वज हा गौरवाचा विषय होता. तसा मध्ययुगात आन, बान, शान म्हणून विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं…त्यावेळी प्रत्येकाच्या रक्तालाही उसळी येईल असे “हर हर महादेव” या मंत्राबरोबर स्वराज्य ध्वज उंचावून मृत्यूलाही जिंकणारे स्फूलिंग निर्माण केले. तसेच या ध्वजाला स्वराज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या रक्ताचं नातं वाटावं एवढं बळ निर्माण करून दिलं.. यशाचं मापदंड म्हणून हे स्वराज्य पताका गौरवांनी इतिहासतही विराजमान झाली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा गौरवी इतिहास मधला काही काळ वगळता सुरूच राहिला नव्हे मराठ्यांनी आपलं स्वराज्य प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलं…. सर्वात मोठं यश मिळालं ते 28 एप्रिल 1757 रोजी.. हे मराठ्याच्या इतिहासातील अत्यंत गौरवी सोनेरी पानच… रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्यंत खडतर प्रवास करून आताच्या पाकिस्तानात असलेला सिंध खोऱ्यातील “अटक” किल्ला जिंकला. त्यातून ‘अटकेपार झेंडे’ ही म्हण प्रचलित झाली… आजही मराठी माणूस अत्यंत अभिमानाने हे अटकेपार झेंडे ही म्हण वेळोवेळी वापरतो.
भारताने तिरंगा झेंडा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला
स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलै 1947 या दिवशी ठरावाला मंजुरी दिली.
भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याच बरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज तिरंगा झाला. हा देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हजारो लोकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून, लाठ्या, काठ्या खाऊन, जेलमध्ये अनंत यातना सहन करून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले देह झिजवले आहेत. त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक आपला तिरंगा आहे.
हे वर्षे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपल्या देशाने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रत्येकाच्या घरावर फडकावा म्हणून “हर घर तिरंगा” ही मोहीम राबविली आहे. प्रत्येक भारतीयांनी या मोहिमेत मोठ्या अभिमानाने, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन आपापल्या घरावर आपल्या देशाची आन, बान आणि शान तिरंगा हा राष्ट्रध्वज ध्वज संहितेचे पूर्ण पालन करून फडकवावा..
झण्डा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झण्डा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
सदा शक्ती बरसाने वाला
प्रेम सुधा बरसाने वाला
वीरों को हर्षाने वाला
मातृ भूमी का तन मन सारा
मातृ भूमी का तन मन सारा
हे देशभक्तीपर गीत म्हणजे प्रत्येक भारतीय माणसाच्या मनातली भावना आहे. आपण भारतीय म्हणून आपल्या प्रतिकाचे जतन तर करूच पण हा देश सुजलाम्, सुफलाम् होण्यासाठी अजून मोठे प्रयत्न करु.. जगात आपला देश, आपला तिरंगा सदैव अभिमानाने फडकत राहावा ही भावना अंतःकरणात ठेवू या…. जय हिंद..!!
– युवराज पाटील (जिल्हा माहिती अधिकारी, लातूर)
Article on indian Tricolor Flag History