मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जगातील प्रत्येक व्यक्तीला आपण आनंदी राहावे, आपले कुटुंब व समाज आनंदी राहावा असे वाटते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु बहुतांश नागरिकांच्या जीवनात काहीतरी कष्ट आणि अडचणी येतात त्यामुळे ते दुःखी होतात. जगात असे अनेक देश आहेत की, त्या देशातील नागरिकांच्या पुढे अनेक समस्या आहेत. सध्याचा विचार केला तर श्रीलंके सारख्या देशापुढे महागाईचे मोठे आव्हान उभे आहे. या देशातील विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी देखील कागद नसल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली होती.
पाकिस्तान मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे, हा देश जागतिक दर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबला आहे. अशावेळी जगात असे काही देश आहेत की, येथील नागरिक खूपच सुखी, समाधानी असल्याने नेहमीच आनंदी असतात. कोणते आहेत असे देश ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते जागतिक आनंद अहवालाने 10 वर्षे पूर्ण केली. या अहवालात जगातील सर्व देश त्यांच्या आनंदाच्या आधारावर सूचीबद्ध आहेत. वर्ष 2022 मध्ये सर्वात आनंदी देशमुख्यतः 5 आहेत.
सदर अहवाल तीन मुख्य घटकांवर आनंद मोजतो – जीवन मूल्यमापन, सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. फिनलंड पुन्हा एकदा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडला गेला आहे. सर्वात आनंदी देश फिनलंड हा जगातील असा देश आहे जिथे गेल्या 5 वर्षांपासून तेथील नागरिक सर्वात आनंदी आहेत. नुकताच आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यात आला, चला तर मग या यादीतील इतर 5 देशांबद्दल जाणून घेऊ या.
फिनलंड
सुंदर असा फिनलंड सलग 5 व्या वर्षी सर्वात आनंदी देशांच्या यादीत आघाडीवर आहे! जरी हे नॉर्डिक राष्ट्र कोविड-19 महामारीच्या काळात काही आर्थिक मंदीतून गेले असले तरी, साथीच्या रोगाने फिनिश नागरिकांचा आनंद हिरावून घेतला नाही. अंदाजे 5.5 दशलक्ष रहिवासी आणि फिनलंड सरकारचा आशावाद जगाने प्रेरणा घेतली पाहिजे. शतकानुशतके जुने तलाव, बेटे आणि जंगलांनी वेढलेले फिनलंड हिवाळ्यात आणखीनच सुंदर बनते!
डेन्मार्क
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, तो खूप काळापासून जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अव्वल देशांपैकी एक आहे. येथील नागरिकांच्या आनंदामागील काही प्रमुख कारणे म्हणजे स्थिर सरकारची मोफत शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था होय, हा देश अनेक जगप्रसिद्ध समुद्रकिनारे, निळे तलाव आणि सुंदर बेटांनी भरलेला आहे!
आइसलँड
जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये आइसलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात सुमारे 3 लाख 66 हजार रहिवासी आहेत आणि बहुसंख्य लोकसंख्या राजधानी रेकजाविकमध्ये राहते. उच्च राहणीमान, मोफत शिक्षण, कमी बेरोजगारी आणि गुन्हेगारी पातळी हे देशवासीयांच्या आनंदाला कारणीभूत ठरणारे घटक आहेत.
स्वित्झर्लंड
जगातील पहिल्या पाच आनंदी देशांमध्ये स्वित्झर्लंडने आपले स्थान कायम राखले आहे. देशाचा दरडोई जीडीपी उच्च असून येथे भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आनंदाला हातभार लागला आहे. डिझायनर घड्याळे आणि चॉकलेट उत्पादनाचा देश, स्वित्झर्लंड हे आश्चर्यकारकपणे आनंदी राष्ट्र आहे.
नेदरलँड
नेदरलँड सर्वात आनंदी देशांच्या यादीत 5 व्या स्थानावर आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे जीवन आणि कार्यालय यांच्यात चांगला समतोल राखला जातो, उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध आहे आणि गुन्हेगारीचे प्रमाणही खूप कमी आहे. याशिवाय या देशाला एक आकर्षक इतिहास आहे.