हनुमान जयंती विशेष लेख
भारतातील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरे
हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता. त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले, व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला.

मो. ९४२२७६५२२७
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
आपल्या देशात हनुमानाची लाखो मंदिरे आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या अख्यायिका आहेत. काही मंदिरांना जागृत स्थान म्हटले जाते. बजरंगबली हनुमानाची भक्ती भारतामध्ये बहुतेक सर्वच प्रांतांमध्ये रूढ आहे. हनुमानाची नियमित आराधना करणाऱ्यांवर हनुमानांची कृपादृष्टी नेहमीच असते अशी भाविकांची श्रद्धा आहे.हनुमान जन्मोत्सवा निमित्त देशांतील काही प्रसिद्ध हनुमान मंदिरांचा परिचय करून घेऊ या.
राजस्थानातील बालाजी हनुमान 
भारतामध्ये असलेली अनेक हनुमान मंदिरे खास प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये राजस्थान येथील बालाजी हनुमान मंदिराचा समावेश आहे. दाढी-मिश्या असलेल्या या बजरंगबलीला ‘सालासरवाले हनुमानजी’ या नावानेही संबोधले जाते. हे मंदिर राजस्थानच्या चुरू जिल्ह्यामधील सालासर गावामध्ये स्थित आहे. या मंदिरामध्ये एखादी मनोकामना घेऊन आलेला श्रद्धाळू कधीही निराश होऊन परत जात नसल्याचा या मंदिराचा लौकिक आहे.
गुजरात राज्यातील ‘हनुमान दंडी’
गुजरात राज्यातील ‘हनुमान दंडी’ मंदिरामध्येही भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळते. या मंदिरामध्ये हनुमानाच्या सोबत हनुमान-पुत्र मकरध्वजाची प्रतिमा देखील आहे. पूर्वी मकरध्वजाची मूर्ती आकाराने लहान होती, पण आता हनुमानाच्या मूर्तीच्या आकाराइतकी मकरध्वजाची मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. अहिरावणाने जेव्हा राम-लक्ष्मणाचे अपहरण केले, तेव्हा तो त्यांना याच ठिकाणी घेऊन आला असल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर राम आणि लक्ष्मणाला सोडविण्यास जेव्हा हनुमान आले, तेव्हा त्यांना मकरध्वजाशी युद्ध करावे लागले. या युद्धामध्ये मारुतीने मकरध्वजाचा पराभव केला व त्याच्याच शेपटीने त्याला बांधून ठेवले. राम आणि लक्ष्मणाला परत नेण्यापूर्वी मकरध्वज आपलाच पुत्र असल्याचा साक्षात्कार मारुतीला याच ठिकाणी झाला असल्याची ही आख्यायिका आहे.
मेहंदीपूर हनुमान मंदिर, राजस्थान 
ज्यांना तथाकथित ‘भूतबाधा’ झालेली असते अशा व्यक्तींना घेऊन भाविक मेहंदीपूर येथील हनुमान मंदिरामध्ये येतात. येथे आल्यानंतर बाधा उतरून व्यक्ती पूर्ण बरी होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. जयपूर पासून ६५ किमी अंतरावर असलेल्या मेहंदीपुर येथे जयपूर-बांदीकुई बस मार्गावर हे मंदिर आहे.
वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिर 
गोस्वामी तुलसीदास यांच्या कठीण तपश्चर्येनंतर प्रकट झालेली मूर्ती असलेले वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये येऊन भाविकांनी मारुतीचे केवळ दर्शन घेतल्याने भाविकांच्या अडचणींचे निवारण होत असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या मंदिराला संकटमोचन मंदिर या नावाने ओळखले जाते.
‘हनुमानगढी’ अयोध्या, उत्तर प्रदेश 
अयोध्या येथील प्रसिद्ध पवित्र धाम ‘हनुमानगढी’ नावाने ओळखले जाते. रामजन्मभूमीपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराला ६० पायर्या आहेत .त्या चढून गेल्यावर ह्नुमनाचे दर्शन घडते. या मंदिरामध्ये दर्शन केल्याखेरीज अयोध्येची यात्रा समाप्त होत नसल्याची भाविकांची मान्यता आहे.
झोपलेल्या हनुमानाच्या मूर्ती
भारतात अशा आठ मूर्ती आहेत : १. भद्रा मारुती (खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ). २, अलाहाबादेत यमुनेच्या तीरावर (संगम घाटावर) ३, मध्य प्रदेशात जाम सावली येथे ४. राजस्थानमध्ये अलवर येथे ५. राजकोट ६. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पिलुआ गावात, ७. चांदोली जिल्ह्यात आणि ८. छिंदवाडा येथेही बजरंगबलीची झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती आहेत.
भद्रा मारुती मंदिर, खुलताबाद (औरंगाबाद) महाराष्ट्र
औरंगाबाद जिल्ह्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद तालूका आहे. येथे भद्रा मारुती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे, येथील बजरंगबलीची मूर्ती निद्रा अवस्थेत आहे. हनुमान जयंती आणि रामनवमी निमीत्त येथे भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
प्रयागराजमधील संगमतटावरील सोये हुये हनुमानजी 
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील संगमतटावर असलेल्या हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेतील आहे. वीस फुट लांबीची ही प्रतिमा असून, दर वर्षी पावसाळ्यामध्ये गंगेचे वाढलेले पाणी या मंदिरामध्ये येत असते. गंगेचे पवित्र मानले जाणारे जल या मंदिरामध्ये येणे हा भाविकांच्या साठी शुभसंकेत मानला जातो. हनुमानाला स्नान घालण्यासाठी स्वतः गंगा या मंदिरामध्ये येत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
उलटे हनुमान मंदिर, सांवरे, मध्य प्रदेश 
मध्य प्रदेशातील उज्जैन पासून ३० किमी अंतरावर सांवरे नावाच्या गावात रामायण कालीन हनुमान मंदिर आहे. येथील हनुमान मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे उलट्या हनुमानाची पूजा केली जाते. मंदिरांत हनुमानाची उलटी शेंदूर चर्चित मूर्ती आहे.
नारी रूपातील हनुमान
छत्तीसगड मधील बिलासपुर पासून २५ किमी अंतरावर रतनपुर नावाचे गाव आहे. या गावाला महामाया नगरी देखील म्हणतात. या गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे ह्नुमानाच्या नारी रुपाची पूजा केली जाते. देशातील बहुदा हे एकमेव मंदिर असावे जिथे महाशक्तीशाली हनुमान स्त्री रुपांत पुजला जातो.
सपत्निक हनुमान 
सगळे जग जरी हनुमानाला बालब्रह्मचारी म्हणून पूजीत असले तरी तेलंगनात हनुमान विवाहित होता असे मानले जाते. भारतातील दाक्षिणात्य ग्रंथांमध्ये हनुमानाला सुवर्चला नावाची पत्नी होती. ती सूर्यदेवाची कन्या होती. हनुमानाचे हे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले.अशी मान्यता आहे. एवढच नाही तर हैदराबाद पासून २२० किमी अंतरावर खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्याची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर आहे. हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे दर्शन घेतल्यावर वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी श्रद्धा असल्याने हजारो भाविक येथे नित्य दर्शनाला येतात.
हनुमानाच्या वेगवेगळया जन्मतिथी
हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते. हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हटले जाते.
			








