कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह
कोरोना या भयंकर महामारीने संपुर्ण जग हादरले आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या ५० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत, हे ऐकून प्रत्येकाच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणे नाही.
– विजय पवार (निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी)
सर्दी, पडसे, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे दिसतात. माणूस घाबरतो आणि प्रथम अँटिजेन टेस्ट करुन घेतो. डॉ. म्हणतो नाका तोंडातला स्वॅब घेतला जातो तो RTPCR Test करुन घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे ती केल्यावर दुर्दैवाने POSITIVE आली की पळापळ सुरु होते. येथून खरा अडथळ्यांचा प्रवास येथूनच सुरु होतो.
रुग्णाचे नातेवाईक त्याला रुग्णात दाखल करण्यासाठी फोनाफोनी करतात. काही केल्या बेड उपलब्ध होत नाही. महत्प्रयासाने बेड मिळल्यास त्यांना सिटी स्कॅन HRCT टेस्ट करायला सांगतात. तेथेही बरेच रुग्ण टेस्ट साठी नंबर लावून असतात. मोठ्या प्रयत्न करत टेस्ट झाल्यावर डॉ. रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला सांगतात हे इंजेक्शन मिळतच नाही. मिळाले तर १२०० रुपयांचे इंजेक्शन दहा हजार रु देऊन ब्लॅकने खरेदी करावे लागते.
रुग्णालयात उपचारासाठी ऑक्सिजन उपलब्ध नाही असे सांगण्यात येते, पुढे जाऊन रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची पाळी आली की ते रुग्णालयात उपचारासाठी उपलब्ध नाही.
दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला शववाहिका मिळत नाही. ती मिळाल्यास स्मशानभूमीत बेड उपलब्ध नाही. तेथेही रांग असते. कधी कधी रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशा रितीने कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह टेस्ट मात्र त्यापुढे सर्वच निगेटिव्ह असा प्रवास सुरु आहे.